कंगणाच्या बहिणीने केला आदित्य पांचोलीवर बलात्काराचा आरोप!

Mumbai
aditya-pancholi
अभिनेता आदित्य पांचोली

सध्या बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असणाऱ्या कंगणा राणावतवर तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांमध्ये बलात्कार केल्याचा आरोप सिनेअभिनेता आदित्य पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या तब्बल १३ वर्षांनी हा आरोप करण्यात आला आहे. कंगणा राणावतची बहीण आणि तिची प्रवक्ती रंगोली चंडेलने वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये त्यासंदर्भात लेखी तक्रार केली असून पोलीस या तक्रारीची शहानिशा करत आहेत. कंगणा राणावतची १३ वर्षांपूर्वी तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये आदित्य पांचोलीशी ओळख झाली होती. त्यावेळी त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली होती. याच मैत्रीचा फायदा घेऊन आदित्य पांचोलीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला आहे.

अब्रुनुकसानीचा दावा आणि रिझवान सिद्दिकी!

दरम्यान, यानंतर अनेकदा वृत्तवाहिन्यांशी बोलताना आदित्य पांचोलीवर कंगणाने अत्याचाराचे आरोप केले होते. या आरोपांनंतर आदित्य पांचोलीने तिच्यावर अब्रुनुकसानीचा दावादेखील अंधेरीतील लोकल कोर्टात सादर केला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी कंगणाच्या वतीने तिचा वकिल रिझवान सिद्धीकी हा ६ जानेवारी २०१९ रोजी आदित्य पंचोलीला भेटला होता. यावेळी वकिलाने ही तक्रार मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आदित्य पांचोलीने तक्रार मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता कंगणाच्या बहिणीने वर्सोवा पोलिसांत लेखी अर्जाद्वारे त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार केली आहे. या तक्रारीची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. लवकरच आदित्य पंचोलीसह इतरांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.


हेही वाचा – हत्येप्रकरणी आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, मानहानीची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळेच त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा आदित्य पंचोलीने केला आहे.