‘कंगणाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही’, गृहमंत्री अनिल देशमुखांचं मोठं विधान!

kangana ranaut

अभिनेत्री कंगणा रनौत तिच्या वक्तव्यांमुळे सध्या भलतीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून Sushant Singh Rajput Death प्रकरणात कंगणाने बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांवर टीका करणारी वक्तव्य केली होती. त्यापाठोपाठ कंगणानं बॉलिवुडच्या ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य करताना काही मोठ्या नावांचा देखील उल्लेख केला. या पार्श्वभूमीवर नुकताच कंगणानं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव घेऊन ‘राऊतांनी मला मुंबईत न येण्याची धमकी दिली’ असा आरोप कंगणानं केला. त्यानंतर सुरू झालेल्या वादात कंगणानं थेट मुंबई पोलिसांनाच लक्ष्य केल्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘कंगणाला महाराष्ट्रात, मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’, अशा प्रकारचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली होती कंगणा?

अभिनेता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी केलेल्या वक्तव्यांनंतर कंगणानं थेट संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर तिने केलेलं विधान माध्यमांमध्ये बरंच चर्चेत आलं आहे. ‘मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय’, असं कंगणानं म्हणताच भाजप, शिवसेना, मनसे या पक्षांकडून कंगणाना मुंबईत न येण्याबद्दल इशारे दिले जाऊ लागले. त्या पार्श्वभूमीवर ‘येत्या ९ सप्टेंबरला मी मुंबईत येत आहे. कुणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा’, असा इशाराच कंगणानं दिल्यानंतर सगळा रोख कंगणाच्या विरोधात जाऊ लागला आहे. बॉलिवुडमधील अनेक दिग्गजांसोबतच राजकीय विश्वातून देखील कंगणाना टार्गेट केलं जाऊ लागलं आहे. त्याच मुद्द्यावर थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनीच ‘कंगणाला मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही’, असं विधान केलं आहे.