कंगणावर संजय राऊत म्हणाले, ‘मान्य नसणाऱ्यांनी त्यांचा बाप दाखवावा’!

kangana ranaut sanjay raut

मुंबईबद्दल अभिनेत्री कंगणा रनौतनं केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘संजय राऊतांनी मला मुंबईत न येण्याची धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणाऱ्या ग्रॅफिटी दिसल्या. आता तर मला उघड धमक्या येऊ लागल्या आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?’ असा सवाल करणाऱ्या Kangana Ranaut ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. वचन आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र’, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. ‘मी ९ सप्टेंबरला मुंबईत ये आहे. कुणाच्या बापाची हिंमत असेल, तर मला अडवून दाखवा’, असं ट्वीट कंगणानं केलं होतं. त्यावर राऊतांनी हे ट्वीट केलं आहे.

संजय राऊत धमकी देत असल्याचा आरोप कंगणानं केल्यानंतर देखील संजय राऊतांनी ‘कंगणानं ट्वीटरचे खेळ करू नयेत, पुरावे असतील तर सादर करावेत’, असं म्हटलं होतं. त्या ट्वीटपासून कंगणा विरूद्ध संजय राऊत असा वाद सुरू झालेला आहे. यामध्ये सर्वात शेवटचं ट्वीट संजय राऊतांनी करून थेट ‘मान्य नसणाऱ्यांनी आपला बाप दाखवावा’, असं म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक चिघळणार असल्याचंच दिसत आहे.

मुंबईचं बॉलिवुड दुसरीकडे हलवण्याचा डाव?

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्वीट करण्याआधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील कंगणा प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये कंगणा राणावत कधी गेल्या होत्या? तिथे काय अनुभव आले? की ज्याची तुलना त्यांनी मुंबईशी केली? म्हणून आम्ही म्हणतो कि मुंबई किंवा राज्याच्या सरकारवर तुमचा विश्वास नसेल, तर मुंबईत राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. वारंवार मुंबई पोलीस, महाराष्ट्राला बदनाम करून राज्यात येणाऱ्या लोकांना मुंबईत येण्यापासून परावृत्त करायचं, असा हा डावपेच आहे का? कारण मुंबईतले बरेच उद्योग गुजरातमध्ये गेले. त्यामुळे मुंबईचं बॉलिवुड देखील दुसरीकडे हलवण्याचं हे कारस्थान सुरू आहे का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. कंगणाला आव्हान आहे की त्यांच्याकडे सुशांतच्या प्रकरणातली जी काही माहिती आहे, ती त्यांनी समोर मांडावी. अशा प्रकारे कुणी वातावरण खराब करत असेल, तर त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे’, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.