नितीन नांदगावकरांचे शिवसेनेतही चालेना; ‘कराची स्वीट्स’ प्रकरणात नांदगावकरांना राऊतांचा टोला

शिवसेना नेते नितीन नांदगावकर आणि खासदार संजय राऊत

मनसेमधून शिवसेनेत दाखल झालेले फायरब्रँड नेते नितीन नांदगावकर यांच्या भूमिकांना शिवसेनेतही डावलण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदगावकर यांनी मुंबईतल्या वांद्रे येथील ‘कराची स्वीट्स’ बेकरीचे नाव बदलण्यात यावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिकेत तथ्य नसून ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे सांगितले. त्यामुळे मनसेत असताना नांदगावकर यांच्या जनता दरबारावर जसे गंडातर आले होते. त्याप्रमाणेच त्यांच्या मागणीची शिवसेनेतही गळचेपी होत असल्याचे दिसत आहे. मात्र यामुळे शिवसेनेतील संभ्रम चव्हाट्यावर आला आहे.

नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील कराची बेकरीला भेट देऊन दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. या संभाषणाचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे. दुकानदाराचे पुर्वज कराची येथून आल्यामुळे दुकानाचे नाव कराची ठेवल्याचे मालकाकडून सांगण्यात आले होते. त्यावर पुर्वजांचे नाव दुकानाला द्या, पण कराची नाव नको, अशी भूमिका नांदगावकर यांनी मांडली.

नांदगावकर यांच्या भूमिकेनंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत आक्षेप नोंदविला. “कराची बेकरी आणि कराची स्वीटस ६० वर्षापासून मुंबईसह देशात आहे. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला, ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.”, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

दुसरीकडे मराठी पाट्या आणि मराठी नावांचा आग्रह धरणाऱ्या मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी कराची स्वीट्सच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून नाव बदलण्याची मागणी केली. आहे. “देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानमधील शहर ‘कराची’ या नावाचा आधार घेत आपण बहुचर्चित कराची स्वीट्स नावाचे आस्थापन सुरू केलं आहे. त्याचा प्रचार आणि विस्तार करून भारतीयांचा भावनांना ठेच पोहोचवून व्यवसाय करत आहात. तसेच मराठी भाषेचाही द्वेश करत आहात त्याबाबत आक्षेप आहे.” असा आक्षेप मनसेने पत्रातून नोंदविला आहे.