कर्नाळा बँकेत किमान एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा

विवेक पाटील यांची ईडीमार्फत चौकशी करा!

Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमय्या

शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्ब्लल ५१३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. हा घोटाळा किमान एक हजार कोटी रुपयांचा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विवेक पाटील यांनी परदेशात पळ काढण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, त्यांची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत या घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मोठ्या प्रमाणात असलेल्या या घोटाळ्यामुळे एक लाख लोकांवर याचा परिणाम होणार असल्याची चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मार्केट यार्ड येथे झालेल्या या भरगच्च पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, कर्नाळा बँकेत शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नावे ६३ बोगस कर्ज खाती तयार करून माजी आमदार विवेक पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने ५१३ कोटींचा अपहार केला. त्यामुळे या बँकेचे दिवाळे निघाले.

आणखीही अशी खाते असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरव्यवहाराचा आकडा हजार कोटी रुपयांच्या घरात असू शकतो. ठेवीदार व खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. बँकेकडून फक्त आश्वासने,दमदाटी केली जात असल्याने ठेवीदार चिंतेत आहेत.अनेक ठेवीदारांचा या धसक्याने मृत्यूही झालेला आहे.अशावेळी बँकेच्या नेत्यांनी योग्य मार्गदर्शन करून वेळेवर त्यांचे पैसे देणे क्रमप्राप्त होते. शेकडो ठेवीदारांनी बँकेत फेर्‍या मारल्या मात्र बँकेला त्यांची किंचितही दया आली नाही. उलटपक्षी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेवीदारांची वारंवार फसवणूक केली आहे. बँकेत घोटाळा झाल्यामुळेच त्यांना ठेवीदारांना त्यांचे पैसे देता आले नाहीत. ठेवीदारांनी जेव्हा आमच्याकडे संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली आणि त्याअनुषंगाने आम्ही यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला, असे सोमय्या यांनी सांगितले.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने सहकार खात्यास पत्र पाठवून कर्नाळा बँकेच्या संपूर्ण कर्ज व्यवहाराचे विशेष लेखा परिक्षण करण्याच्या सूचना केल्या. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या पत्रानुसार सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट ्रराज्य यांनी जिल्हा विशेष लेखा परिक्षक, सहकारी संस्था, रायगड अलिबाग यांच्या मार्फत फक्त ६३ कर्जखात्यांची चौकशी केली. जिल्हा विशेष लेखा परिक्षक, सहकारी संस्था, रायगड,अलिबाग यांनी त्यांचा चौकशी अहवाल दि.१९डिसेंबर २०१९ रोजी सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट ्रराज्य यांच्या कार्यालयास सादर केलेला आहे. सदरच्या चौकशी अहवालात चौकशी अधिकार्‍यांनी ६३ कर्जखात्यातून ५१२ कोटी ५५ लाख रुपये या रक्कमा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी व अन्य खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे स्पष्ट केलेले आहे, असे सोमय्या म्हणाले.

कर्नाळा नागरी सहकारी बैंक लि., कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी या तिन्ही संस्थाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील हे आहेत. एकूण कर्ज ६३३ कोटी ७९ लाख रुपये आहे. सदर कर्जापैकी ८१ टक्के कर्ज रक्कम ६३ कर्जदारांना दिलेले आहेत. बाकी शिल्लक राहिलेल्या कर्जखात्यांपैकी बहुतांश कर्जखाती बोगस असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणात मुद्रांक शुल्क विभागाचे करोडो रुपये बुडवल्याचे निदर्शनास आले आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

६३ बेनामी नावाने कर्ज वितरण झालेल्या कर्जदारांपैकी ५३ जणांनी आपण हे कर्ज घेतले नसल्याचे आरबीआय व सहकार विभागाला लिहून दिले आहे. हे कर्ज विवेक पाटील यांनी आमच्या नावाने काढले आहे. तसेच संचालक मंडळाने विवेक पाटील यांच्या सांगण्यानुसार कर्ज वाटप झाले आहे असे स्पष्ट केले आहे.

आम्ही संचालक असलो तरी एकहाती कारभार विवेक पाटील चालवतात असे ताशेरेच संचालक मंडळाने विवेक पाटील यांच्यावर ओढले आहेत. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी विवेक पाटील यांच्या चिरंजीवांचे संचालक मंडळामधून नाव काढण्यात आले असून गेल्या चार महिन्यात विवेक पाटील यांनी ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले नाहीत, मात्र १५० कोटी रुपये बँकेतून काढण्यात आल्याची माहिती आहे.

कर्नाळा बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा माझ्यावर आणि बँकेत जे आरोप करण्यात आले, पण असा कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. अनेक लोक जे कर्नाळा बँकेतून कर्ज घेऊन उद्योजक झाले ते आज बँकेवर आणि माझ्यावर आरोप करत आहेत. बँकेत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, अनियमितता असेल तरी काम करून निश्चित दूर केली जाईल. विवेक पाटील कुठेही पळून जाणार नाही. माझ्यावर आरोप करणार्‍यांना मीच माझा पासपोर्ट देतो. मी ठेवीदारांना भेटतो, त्यांना समजावून सांगतो.
-विवेक पाटील, अध्यक्ष, कर्नाळा बँक.

आम्हाला राजकारण करायचे नाही. राजकारणात ज्यांना हरवायचे होते त्यांना हरवले आहे. सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे मिळाले पाहिजेत हाच आमचा मुळ उद्देश आहे. विवेक पाटील यांनी ग्रामपंचायतींनाही सोडले नाही. अनेक ग्रामपंचायतींचे कोटी रुपये या बँकेत अडकले आहेत. ठेवीदारांचे पैसे ताबडतोब मिळावेत अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
– आमदार महेश बालदी, अध्यक्ष-ठेवीदार संघर्ष समिती

ठेवीदारांना बँक वेळेवर पैसे देईल अशी आशा होती. बँकेत वारंवार फेर्‍या मारून ठेवीदार थकले मात्र पैसे अद्यापही त्यांना मिळाले नाहीत. घोटाळा करून सर्वसामान्य जनतेचे पैसे स्वतःच्या खिशात घालण्याचे काम करणारे विवेक पाटील आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी.
– आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष- ठेवीदार संघर्ष समिती

मी कर्नाळा बँकेतील कुठल्याही कर्जास जामीन नसतानाही माझे जामीनदार म्हणून नाव आले आहे. अशा प्रकारच्या बोगस कारभारामुळे अनेक जणांना याचा विनाकारण त्रास होणार आहे. या संदर्भात मी दाद मागणार आहे. अशा प्रकारचे आणखी जामीनदार असतील तर त्यांनीही या संदर्भात दाद मागावी.
– विनोद साबळे.