घरमुंबईसुरक्षित प्रवास व अवयवदानाची जनजागृती

सुरक्षित प्रवास व अवयवदानाची जनजागृती

Subscribe

पावसाळ्यातील निसरडे रस्ते व खड्डे यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अपघात रोखले जावेत व नागरिकांचा जीव वाचवा यासाठी केईएम रुग्णालयातील रिजनल ऑर्गन अँड टीशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (रोटो) विभागातर्फे अनोखी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पावसाळ्यातील निसरडे रस्ते व खड्डे यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अपघात रोखले जावेत व नागरिकांचा जीव वाचवा यासाठी केईएम रुग्णालयातील रिजनल ऑर्गन अँड टीशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (रोटो) विभागातर्फे अनोखी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ‘मी सुरक्षित प्रवासाची शपथ घेतो, मी अवयवदानाची शपथ घेतो, तुमचे काय?’ असा प्रश्न विचारत नागरिकांमध्ये सुरक्षित प्रवास व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

बेदरकारपणे वाहने चालवल्याने पावसाळ्यात अपघात घडण्याच्या अनेक घटना घडतात. यामध्ये जखमी होण्याबरोबरच मृत्यू होणार्‍यांची संख्या अधिक असते. मृत्यूमुखी होणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबियांवर मोठा आघात होत असतो. अशावेळी काही प्रकरणात मृत व्यक्तीचे नातेवाईक त्याचे अवयवदानाचा निर्णय घेतात. अपघाती मृत्यूनंतर अवयवदान करण्यापेक्षा संपूर्ण आयुष्य आनंदाने जगून त्यानंतर अवयवदान करणे महत्त्वाचे असते. अनेक तरुणांचा बेदरकार वाहने चालवण्याकडे कल असतो तर अनेकांचा अपघात खड्ड्यांमुळे होत असतो. ही बाब लक्षात घेऊन केईएम रुग्णालयातील रोटो विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

या मोहीमेंतर्गत शहरातील पेट्रोल पंपांवर जनजागृती करणारे बॅनर लावण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालवतानाच्या नियमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच वाहनांमध्ये पेट्रोल भरताना ‘रोटो’चे स्वयंसेवक वाहनचालकाला व गाडीतील अन्य प्रवाशांना वाहने सावकाश चालवण्याबाबत तसेच अवयवदानाबाबत माहिती देणार आहेत. ही माहिती देण्याबरोबर ते वाहनचालक व गाडीतील अन्य प्रवाशांना रस्ते सुरक्षेची व आपली काळजी घेण्याची शपथ देणार आहेत. ही शपथ घेतल्यानंतर ज्या व्यक्तीला आपले अवयवदान करण्याची इच्छा असेल त्या व्यक्तीकडून अवयवदानाचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे, अशी माहिती केईएममधील रोटोच्या समन्वयक डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली.

अपघातामध्ये मेंदूमृत होऊन घरच्यांवर अवयवदान करण्याची वेळ येण्याऐवजी प्रत्येकाने सुरक्षित वाहने चालवून कुटुंबासहित आनंदात आयुष्य व्यतीत करावे. तसेच स्वत:हून पुढाकार घेत अवयदानाची शपथ घेऊन त्याचा अर्ज नागरिकांनी भरावा यासाठी ही मोहीम आम्ही हाती घेत आहोत. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
– डॉ. कामाक्षी भाटे, समन्वयक, रोटो, केईएम हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -