मुंबई सेंटर येथून अपहरण करण्यात आलेल्या ७ आणि ५ वर्षांच्या दोघी बहिणी गिरगाव येथे सापडल्या आहेत. आग्रीपाडा पोलिसांनी एका २० वर्षाच्या तरुणाला तब्यत घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अहवालानंतर मुलीवर लैगिंग अत्याचार झाला आहे का कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण
मुंबई सेंटर परिसरात मामाकडे राहणाऱ्या ७ आणि ५ वर्षाच्या दोन बहिणींना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी तरुण चॉकलेट देतो, म्हणून घेऊन गेला होता. मात्र बराच वेळ मुली परतल्या नसल्यामुळे मुलींच्या मामाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलींच्या शोध सुरु केला असता मुंबई सेंटर परिसरातील एका सीसीटीव्हीत या दोन बहिणींना एक तरुण हाताला पकडून घेऊन जात असल्याचे दिसून आले.
दोघी गिरगांवात सुखरूप
आग्रीपाडा पोलिसांनी सोशल मीडियाची मदत घेऊन सदर मेसेज व्हायरल केला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही बहिणी गिरगाव परिसरात सापडल्या. पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांना प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी नायर रुग्णालयात दाखल केले. यावेळी, आग्रीपाडा पोलिसांच्या एका पथकाने दोन्ही बहिणांना घेऊन जाणाऱ्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी कऱण्यात येत आहे. अपहरण कऱण्यात आलेल्या दोन्ही बहिणीची आई क्षयरोगाने आजारी असून तिच्यावर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. मुलींचा सांभाळ करण्यासाठी मुलींना मजुरी करत असलेल्या मामाकडे ठेवण्यात आले होते.