घरमुंबईपुरुषाच्या शरीरातून काढली १२ किलोंची दोन मूत्रपिंड

पुरुषाच्या शरीरातून काढली १२ किलोंची दोन मूत्रपिंड

Subscribe

गोव्यात स्थायिक असणाऱ्या ४१ वर्षीय पुरुषाच्या शरीरातून एकूण १२ किलो वजनाची दोन्ही मूत्रपिंड काढणं मुंबईतील डॉक्टरांना शक्य झालं आहे. १२.८ किलो एवढ्या जास्त वजनाची मूत्रपिंड काढल्याची ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

गोव्यात स्थायिक असणाऱ्या ४१ वर्षीय पुरुषाच्या शरीरातून एकूण १२ किलो वजनाची दोन्ही मूत्रपिंड काढणं मुंबईतील डॉक्टरांना शक्य झालं आहे. १२.८ किलो एवढ्या जास्त वजनाची मूत्रपिंड काढल्याची ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. या व्यक्तीला ऑटोसोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा अनुवंशिक आजार होता. त्यामुळे, या व्यक्तीवर प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव आणि मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ रेनल सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शहा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीपणे मूत्रपिंडे काढली आणि त्याचवेळी स्वॅप किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून या रुग्णाला नवसंजीवनी दिली.

रोमन या ४१ वर्षीय रुग्णाच्या पत्नीने तिचे मूत्रपिंड अमरावतीतील नितीन या रुग्णाला दिले. अमरावतीतील हे कुटुंबही योग्य मूत्रपिंडाच्या शोधात होते. तसेच, नितीन यांच्या पत्नीने त्यांचे मूत्रपिंड रोमन यांना दान केले. अशा पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रियेसह प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

- Advertisement -

गोव्याचे रहिवासी असलेल्या रोमन यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती आणि ते डायलिसिसवर होते. त्यांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा आजार होता. हा एक अनुवंशिक आजार असून यात मूत्रपिंडामध्ये अनेक गळू तयार होतात. त्यामुळे, मूत्रपिंडाच्या ऊतींची कार्यक्षमता कमी होते. याशिवाय, अनेक त्रासांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे, त्यांनी मुंबईत उपचारांसाठी दाखल होण्याचा निर्णय घेत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, स्वॅप प्रत्यारोपण करता येईल असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

याविषयी अधिक माहिती देताना युरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव यांनी सांगितलं, “ रोमन यांच्या मूत्रपिंडांची लांबी फुटभर होती. त्यामुळे, लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यांच्यावर ओपन शस्त्रक्रिया करण्यात आली असून १२.८ किलो वजन असलेली दोन्ही मूत्रपिंडे एक छेद देऊन काढण्यात आली . “

सामान्य मूत्रपिंडांच्या वजनापेक्षा अधिक वजनाची मूत्रपिंडे –

१२ नोव्हेंबर २०१९ या दिवशी रोमन यांच्या शरीरातील ७ किलो आणि ५.८ किलो वजनाची दोन्ही मूत्रपिंडे काढण्यात आली. सामान्य मूत्रपिंडाचे वजन जवळपास १५० ग्रॅम असते आणि त्याची लांबी ८-१० सेमी असते. पण, रोमन यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या मूत्रपिंडांचे वजन जवळपास २६ सेमी आणि २१ सेमी होते.

स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणाने वाचवले दोघांचेही प्राण –

डॉ. भरत शाह यांच्या सांगण्यानुसार, “ स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट किंवा ज्याला पेअर्ड किडनी डोनेशन असेही म्हटले जाते, त्या शस्त्रक्रियेमध्ये दोन कुटुंबांमधील दाते आपले मूत्रपिंड परस्परांच्या कुटुंबियांना देतात. गोव्यातील रोमन आणि अमरावती येथील नितीन यांच्यावर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. डॉक्टरांना समजले की रोमन आणि त्यांच्या पत्नीचा रक्तगट एकमेकांशी जुळणारा नव्हता. तसंच, नितीन आणि त्यांच्या पत्नीच्या ऊतीचा प्रकार एकमेकांशी जुळणारा नव्हता. डॉक्टरांनी दोन्ही कुटुंबांशी स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटबाबत चर्चा केली आणि दोन्ही कुटुंबियांनी तत्काळ मान्यता दिली. दोन्ही प्रत्यारोपणे झाल्यानंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -