कोळी बांधव, वारकऱ्यांसह ब्राॅस ब्रॅन्ड पथक ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीस

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी कृष्णकुंजवर दाखल

कोरोनामुळे आर्थिक संकट अनेकांवर ओढावले असतांना गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी कृष्णकुंजवर दाखल होत आहे. आज मंगळवारी देखील कोळी महिला, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. सध्या राज ठाकरेंचे निवासस्थान कृष्णकुंज हे सर्वसामान्य जनतेसाठी समस्या मांडण्याचे ठिकाण बनले असून राज ठाकरेंकडे मांडलेल्या समस्या, व्यथा लवकर मार्गी लागल्याचेही चित्र समोर आले आहे.

आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्राॅस बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली, कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, यात मंदिर उघडण्याची परवानगी अद्यापही सरकारने दिली नाही, कार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं, यासह कार्तिकी वारीसाठी परवनगी द्या अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली.

यासह मुंबईमधील कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकीवर दिली जात नाही अशी तक्रार घेऊन राज ठाकरेंना भेटी देत आहेत. त्याचसोबत सात-आठ महिन्यापासून लग्न व्यवसाय, मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्राॅस ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत आले आहेत, सगळीकडे अनलॉक करत असताना आमच्यावर बंदी का असा प्रश्नही ब्राॅस बँन्ड पथकाने विचारला आहे.

मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मंगळवारी जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरे यांच्या समोर मांडल्या.

या शिष्टमंडळातील प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे हजर होते. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींनी तोंड द्यावे लागले. त्यामुळे या कलाकारांनी देखील आज राज ठाकरेंची भेट घेतली.