घरमुंबईअटलजींच्या स्मारकासाठी नाममात्र दरात जमीन

अटलजींच्या स्मारकासाठी नाममात्र दरात जमीन

Subscribe

लेजर पार्कच्या जागेचे १ रुपया भाडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासाची जागा शिवसेनेने घेतल्यानंतर, बोरीवली, शिंपोली येथील लेजर पार्कची जागा भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने घेतली. म्हाडाच्या माध्यमातून विकसित केलेल्या ‘लेजर पार्क’ची जागा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या शिफारशीनुसार ‘चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन’ला अवघ्या एक रुपया दराने देण्याचा निर्णय सुधार समितीने घेतला. एका बाजूला मोकळ्या जागांबाबत लढा सुरू असतानाच पालिकेतील सत्ताधार्‍यांसोबत आता पहारेकर्‍यांनीही मैदान घेतले आहे. मात्र, यावर विरोधी पक्ष तसेच एनजीओंनी आवाज उठवलेला नाही. सुधार व महापालिकेच्या मान्यतेनंतर नगरविकास खात्याच्या मंजुरीने ही जागा भाजप आपल्या ताब्यात घेणार आहे.

बोरीवली पश्चिम येथील एम.भंडारी मार्गावर लेजर पार्कसाठी आरक्षित असलेल्या ९ हजार २६३ चौरस मीटर जागेचा विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हे लेजर पार्क माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत आहे. या लेजर पार्कसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी लेजर पार्कच्या देखभालीसाठी ‘चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन’ या संस्थेची नेमणूक करण्याची शिफारस केली. त्यानुसार म्हाडाने त्या संस्थेची नेमणूक केली. परंतु संस्थेने ३० वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी देखभालीकरिता मिळावे, अशी मागणी केली. त्यामुळे लेजर पार्कची जागा ३० वर्षांकरता वार्षिक १ रुपया दराने उपलब्ध करून देतानाच याच्या देखभालीचा खर्च जास्त असल्याने येथे येणार्‍या पर्यटकांना ५ ते १२ रुपये शुल्क आकारण्याची आणि तसेच इथे होणार्‍या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता फुड कोर्ट उभारण्याची परवानगी या संस्थेने मागितली होती. त्यानुसार बांधकाम करणे व पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था करून महापालिकेच्या धोरणाप्रमाणे शुल्क आकारणी करणे आदींना परवानगी देण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे परवानगीसाठी सादर केला होता. त्यामुळे या सर्व बाबींना परवानगी देण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. परंतु यासाठी पाण्याचे तसेच विजेचे बिल भरण्याचे मान्य करणार्‍या या संस्थेने मालमत्ता कर भरण्यास नकार दिला आहे. तसेच यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित कार्यक्रम नियमित करण्यासही विशेष मंजुरी घेऊन ठेवली आहे. सुधार समितीत याला मंजुरी देण्यात आली. लवकरच महापालिकेच्या मंजुरीने नगरविकास खात्याच्या मंजुरीने लेजर पार्कची जागा ‘चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन’ला पुढील ३० वर्षांकरता दिली जाणार आहे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौरांच्या बंगल्यासह मोकळी जागा शिवसेनेला देण्यास तयारी दर्शवणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी आता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नावाखाली बोरीवलीच्या लेजर पार्कची जागा घेतली आहे. मुंबईतील मोकळ्या जागा राजकीय पक्षांनी हडप केल्यामुळे त्या जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात अशी मागणी होत आहे. संस्थांच्या ताब्यातील मोकळ्या जागा ताब्यात घेण्याची मागणी एका बाजूला होत असतानाच दुसरीकडे उद्यान देखभालीच्या नावाखालीच ३० वर्षांकरता ही जागाच विनोद तावडे यांनी संस्थेच्या नावाखाली आपल्या ताब्यात घेतली आहे. प्रवेश शुल्कासहित वाहनतळ तसेच फुड कोर्ट उभारुन संबंधित संस्था कोट्यवधींची उलाढाल करणार आणि त्यांना मालमत्ता करही माफ करत महापालिकेने भाजपच्या घशात हा भूखंड घातला आहे.

लेजर पार्कमध्ये काय आहे?
लेजर पार्क हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत असून त्या भूखंडावर डेमोक्रेसी बिल्डिंग, एक्झिबिशन हॉल, संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, लायब्ररी, पाथवे यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रथमच प्रोजेक्शन, मॅपिंग, टचस्क्रीन, ग्लास प्रोजेक्शन, ए.आर.टेक्नॉलॉजी, होलोग्राफिक यांसारखे प्रगत तंत्रज्ञान वापरुन लेझर पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.

- Advertisement -

लेजर पार्कची जागा ३० वर्षांकरता ‘चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन’ला देण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. लवकरच तो महासभेत मांडला जाईल. तेथील मान्यतेनंतर नगरविकास खात्याकडे पाठवला जाईल. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत हे लेजर पार्क असल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -