घरमुंबईमहापालिकेतील गटनेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार कारण....

महापालिकेतील गटनेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार कारण….

Subscribe

मुंबई महापालिकेच्या महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुल व लोअर परळ येथील एका उड्डाणपुलाचे भूमिपूजन, राणीबागेतील प्राणी व पक्ष्यांच्या सहा प्रदर्शनी पिंजर्‍यांचे लोकार्पण तसेच मियावकी पध्दतीने शहरी वनीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते रविवारी पार पडणार आहे. परंतु या भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेतील गटनेत्यांसह समिती अध्यक्षांचीही नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या या गटनेत्यांनी चक्क नाराजी व्यक्त करत रविवारी होणार्‍या या महापालिकेच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याचा पावित्रा स्वीकारला आहे.

‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. याशिवाय संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते केशवराव खाड्ये मार्ग व संत गाडगे महाराज चौक ते डॉ. ई. मोझेस मार्ग येथील रेल्वेवरील दोन उड्डाण पुलांचे भूमिपूजनही होणार आहे.तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील प्राण्यांचे नवीन ६ प्रदर्शनी कक्ष यांचे लोकार्पण यासह मुंबईत ६४ ठिकाणी मियावाकी पद्धतीने लागवड करावयाच्या वनीकरण मोहिमेचा शुभारंभ वडाळा (पूर्व) भक्ती पार्क येथील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ च्या दरम्यान होणार आहे.
मात्र, या कार्यक्रम पत्रिकेवर राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे; वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख; पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे; नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे; पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार अजय चौधरी, स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर, स्थानिक आमदार यामिनी जाधव, आमदार रामदास कदम, आमदार भाई जगताप, उप महापौर ऍड. सुहास वाडकर, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदींची नावे टाकण्यात आलेली आहेत. परंतु त्यावर वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत विरोधी पक्षनेते रवी राजा, सपाचे गटनेते आमदार रईस शेख, राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, भाजपचे गटनेते खासदार मनोज कोटक आदींच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्वादी काँग्रेस व सपाच्या गटनेत्यांनी लेखी स्वरुपात महापौर किशोरी पेडणेकर यांना निवेदन पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी महापालिकेच्यावतीने केल्या जाणार्‍या विकासकामांचे भूमिपूजन असो वा लोकार्पण सोहळा असो, त्यामध्ये वैधानिक समिती अध्यक्ष, विशेष समिती अध्यक्ष व गटनेत्यांची नावे क्रमाने छापली जायची. परंतु रविवारी होणार्‍या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचारानुसार गटनेत्यांसह इतर समिती अध्यक्षांच्या नावांचा उल्लेख होणे क्रमप्राप्त होते. परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे हा एकप्रकारचा गटनेत्यांसह इतर समिती अध्यक्षांचा अपमान असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -