वेटरच्या वेषातील पोलीसांची बिबट्या तस्करांवर झडप

Mumbai
Skin Trafficking

वसई:-वेटर बनून पालघर ग्रामीण पोलीसांनी बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या दोनजणांवर झडप घातल्याची फिल्मीस्टाईल घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलात घडली आहे.बिबट्याची कातडी विकण्यासाठी काही जण महामार्गावरील ससुनवघर येथील सुवी पॅलेस या हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सापळा रचण्यात आला. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक गुढे,थोरात,पोलीस नाईक संदीप चव्हाण यांचा समावेश असलेली दोन पथके स्थापन करण्यात आली होती. तर पोलीस उपनिरिक्षक सुरेंद्र शिवदे यांनी स्वतः वेटरचा युनिफॉर्म घालून लक्ष ठेवून होते.

सकाळपासून सापळा रचल्यानंतर दुपारी दोन जण दुचाकीवरून सुवी पॅलेस हॉटेलजवळ आले. त्यासरशी खबर्‍याने इशारा केला.त्यानंतर त्या इसमांना हॉटेलमध्ये येवू देण्यात आले. सापळ्यात अडकल्यानंतर त्यांच्यावर झडप घालण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. त्यानंतर ही कातडी वनाधिकारी नम्रता पवार यांना दाखवण्यात आली.त्यांनी ही कातडी बिबट्याची असल्याचे स्पष्ट केले.या कातडीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत 10 लाख रुपये किंमत असल्याचे पोलीसांनी सांगितले.तसेच ही कातडी कुठून आणली आणि ही कातडी ज्या बिबट्याची आहे, त्याची नखे आणि इतर अवयव कुठे आहेत, याचा तपास केला जात असल्याचे उपनिरिक्षक शिवदे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here