राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर राज्यातील ग्रंथालये सुरु होणार 

राज्यातील ग्रंथालयांच्या विश्वस्त व संचालक मंडळांने गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

mns

राज्यातील ग्रंथालये आणि अभ्यासिका आठवडाभरात सुरू होतील. त्यासंदर्भातील परिपत्रक दोन दिवसांत काढण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिले. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याबाबत राज्यातील ग्रंथालयांच्या विश्वस्त व संचालक मंडळांने गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर ग्रंथालये सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबईसह राज्यातील ग्रंथालये आणि अभ्यासिका बंद करण्यात आल्या होत्या. परंतु सहा महिन्यांपासून ग्रंथालये बंद असल्याने ग्रंथालयांमधील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली होती. तसेच वाचनप्रेमींना पुस्तके उपलब्ध होत नव्हते. अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. एकीकडे राज्य सरकार शॉपिंग मॉल, थिएटर, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देत असताना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासिका बंद का बंद ठेवत आहेत, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपस्थित करत आंदोलनही करण्यात आले होते. मनसेचे महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी वांद्रे येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोरी नंदादीप उद्यानात पुस्तक वाचन आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर ‘राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा’ या मागणीसाठी राज्यातील ग्रंथालयांचे विश्वस्त व संचालक मंडळांने गुरुवारी सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल येथील ग्रंथालयांचे २२ ते २४ संचालक त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर, अखिल चित्रे, गजानन काळे आदी नेते उपस्थित होते. संचालकांची मागणी ऐकल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दूरध्वनी करून ग्रंथालयाच्या संचालक मंडळाची मागणी सामंत यांच्यासमोर ठेवली. तसेच त्यांना तातडीने ग्रंथालये सुरू करण्यास सांगितले. राज ठाकरे व ग्रंथालय संचालक मंडळाची मागणी मान्य करत उदय सामंत यांनी आठवडाभरात राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू करण्याचे आश्वासन दूरध्वनीवरून दिले. तसेच ग्रंथालये सुरू करण्यासंदर्भातील परिपत्रक दोन दिवसांत काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे ग्रंथालये सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रंथालय संचालक मंडळांना दिलासा मिळाला आहे.