घरमुंबईपालिकेत महापौरांचे चालते की आदित्य ठाकरेंचे? वाहनतळाबाबत नवा निर्णय!

पालिकेत महापौरांचे चालते की आदित्य ठाकरेंचे? वाहनतळाबाबत नवा निर्णय!

Subscribe

वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्याच्या निर्णयापाठोपाठ आता पालिकेकडून याबाबत नवीन निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील २७ वाहनतळांशेजारील ५०० मीटर परिसरातील वाहनांवर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरु असून यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. महापौरांसह शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांनी मंजुरी दिल्यानंतर या दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. असे असतानाच शुक्रवारी युवा सेनेचे पदाधिकारी असलेल्या आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आणि जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेऊन स्थानिकांना वाहनतळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. आयुक्तांनी, ही मागणी मान्य केल्यामुळे शिवसेनेच्या तिसर्‍या पिढीतील नेतृत्वाची महापालिकेत चलती असल्याचे स्पष्ट होत आहे.

bmc commissioner
नगरसेवक तथा सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आणि जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांनी आयुक्तांना वाहनतळाबाबत निवेदन दिले

प्रस्तावाला तत्वत: मान्यता

मुंबईतील वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत वाहने उभे करणार्‍यांवर दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत मंजुरी दिली. त्यानुसारच ७ जुलैपासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र, लोकांच्या संतापाचा कडे लोट होऊ लागताच, शिवसेनेला आता एक पाऊल मागे घेण्याची वेळ आली. ज्या शिवसेनेने, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांना अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याची परवानगी दिली, त्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी परस्पर आयुक्तांची भेट घेऊन महापालिकेच्या वाहनतळांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या वाहनांसाठी ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन युवा सेनेचे पदाधिकारी असलेले नगरसेवक तथा सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आणि जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांनी आयुक्तांना दिले. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, या दोन्ही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. परंतु ही भेट घेताना, युवा सेनेच्या अध्यक्षांनी तसेच त्यांच्या दोन्ही शिलेदारांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेत्या यांना विश्वासातच घेतले नाही. या सर्वांना अंधारात ठेवत युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केलेली आणि आयुक्तांनीही त्याला तत्वत: मान्यता दिली.

- Advertisement -

हेही वाचा – वाहनतळाच्या बाहेर वाहने उभी केल्यास १० हजारांचा दंड

प्रतिघर मिळणार पास

यावेळी त्यांनी आयुक्तांना, वाहनतळापासून ५०० मीटर परिसरात जे रहिवाशी आहेत, त्यांना आपली वाहने उभी करण्यासाठी ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. जी कुटुंबे ५०० मीटर परिसरात राहतात आणि ज्यांच्याकडे वाहने आहेत, त्यांच्या वाहनांना ५० टक्के सवलत देण्याची सूचना होती. त्याप्रमाणे रहिवाशांनी आयुक्तांकडे आपल्या वाहनांची माहिती द्यावी, त्यानुसार महापालिकेच्या वतीने संबंधित रहिवाशाच्या एका वाहनाला विशिष्ट प्रकारचा पास उपलब्ध करून दिला जाईल. हा पास एका घरामागे एका वाहनासाठीच असेल. परंतु, दुसरे वाहन असल्यास त्यासाठी त्यांना पूर्ण शुल्क आकारले जावे, अशी सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे ही सवलत दिली जाईल, असे अमेय घोले आणि समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे गटनेत्यांच्या सभेमध्ये हा प्रस्ताव बहुमताने पास करताना, अशा प्रकारच्या अटींचा समावेश करायला हवा होता. परंतु महापौरांनी, लोकांचा विचार न केल्यामुळे प्रत्यक्ष कारवाईत लोकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पीचवर उतरत आपल्या दोन्ही शिलेदारांमार्फत ही किमया साधून आणली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी, आपण महापौर, सभागृहनेते तसेच स्थायी समिती अध्यक्षांना जुमानत नसल्याचे आणि महापालिकेत आपलेच चालते हे दाखवून दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -