आजपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन

Mumbai
this area lockdown for seven days in thane

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरता आजपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दोन जुलैपासून १२ जुलै पर्यंत १० दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसागणिक रुग्णाची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. अनलॉक जाहीर केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. नागरिकांकडून कोणतीही दक्षता घेतली जात नाही तसेच सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजी तसेच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. तसेच केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर केडीएमसी आणि नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

पोलिसांचा कारवाईचा इशारा
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात राहणे अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असे असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत, निर्बंध शिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. विनाकारण फिरणारे, गरज नसताना बाहेर पडणारे यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.

पनवेल ३ ते १३ जुलैपर्यंत बंद !
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ ते १३ जुलै दरम्यान दहा दिवस पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेलमध्ये पुढील दहा कठोर निर्बंध लावल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ‘दै.आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. पनवेल मनपा क्षेत्रात काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सध्या रुग्णांनी २२७७ आकडा गाठला आहे.