घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टग्राऊंड रिपोर्ट: दिग्गजांच्या सामन्यात मनसे किंगमेकर

ग्राऊंड रिपोर्ट: दिग्गजांच्या सामन्यात मनसे किंगमेकर

Subscribe

मुंबईतील प्रमुख मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मानला जातो. यंदा मतदारसंघात पुन्हा एकदा दोन दिग्गज नेते आमने सामने भिडत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होणार्‍या या लढतीत मात्र सर्वांचे लक्ष मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिनाकडे लागून राहिले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरला नसला तरी दक्षिण मुंबईत सध्या किंग मेकर म्हणून मनसेकडे पाहिले जात आहे. त्यातच मनसेने या मतदारसंघात थेट काँग्रेसच्या प्रचारात उडी मारल्याने हाताचे बळ वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. किंबहुना म्हणून शिवसेनेच्या चिंतेत वाढ झाली असून अनेक नेते या मतदारसंघासाठी प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे.

मुंबईसह राज्यातील प्रमुख मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ गणला जातो. राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो. तो या मतदारसंघात येतो. त्यामुळे या मतदारसंघात प्रशासकीय अधिकार्‍यांचा देखील भरणा आहे. इतकेच नव्हे तर देशातील सर्वात महत्वाच्या बाजारपेठांपैकी मस्जिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट या बाजारपेठादेखील याच मतदारसंघात असल्याने व्यापारी वर्गाचा समावेश देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर आतापर्यंत या मतदारसंघाच्या निकालावर नजर टाकली असता या मतदारसंघातून केंद्रीय मंत्रीमंडळात अनेक मंत्री देखील घडविले आहे. त्यामुळे या मतदासंघाकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी खासदार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांना तिकीट देण्यात आली आहे. तर महायुतीकडून पुन्हा एकदा शिवसेनेचे सध्याचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रत्यक्षात गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेचा फायदा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना झाला होता. पण यंदा हा करिश्मा कितपत चालेल, याची शंका वाटते. या मतदारसंघात एकूण सहा आमदार आहेत. ज्यात महायुतीचे एकूण चार तर एक काँग्रेसचा आणि एक एमआयएमचा आमदार आहेत. त्यामुळे तुल्यबळ लक्षात घेता त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याच्या प्रचाराचा आढावा घेतल्यास यंदा ही निवडणूक जास्त चुरशीचे होईल, असे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.

या मतदारसंघात गेल्यावर्षी महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत हे तब्बल १ लाख २८ हजार ५६४ मतांनी निवडून आले होते. त्यांचे हे मताधिक्य जास्त होते. परंतु त्यांच्या चिंतेत यंदा नव्याने भर पडणार आहे. गेल्यावर्षी प्रत्यक्षात निवडणुकीत उतरलेली मनसे यंदा निवडणुकीत उतरलेले नाही. मनसेच्या नेत्यांनी याठिकाणी काँग्रेसचा प्रचार करण्यास देखील सुरुवात केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मनसेच्या पारडयातील ८४ हजार मते जर काँग्रेसच्या पारड्यात पडली तर त्याचा थेट फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे मनसेची ही मते महायुतीच्या पारड्यात पाडण्यासाठी सध्या शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न मतदारसंघात केला जात आहे. इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरुन आप या पक्षाने काँग्रेसला जोरदार झटका दिला होता. पण यंदा आप काँग्रेसच्या बाजूने असल्याने ही आपची गेल्यावर्षीची ४० हजार मते सावतांना महागात पडू शकणार आहेत. त्यामुळेच का होईना अरविंद सावंत यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा वेग वाढविल्याचे चित्र दिसून आले आहे.

- Advertisement -

मुळात या मतदारसंघात पारंपरिक शिवसेनेचा मतदार मोठया संख्येने आहे. परंतु विधानसभेत ज्याप्रमाणे एमआयएमने गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेली टक्कर लक्षात घेता, सेना ताक ही फुंकून पित असल्याचे चित्र सध्या मतदासंघात दिसून येत आहे. तर शिवसेनेचा एक गट सध्या मनसेच्या मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. मुळात शिवसेनेकडून मनसेकडे गेलेला हा मतदारवर्ग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदार करेल, याची शाश्वती नसल्याने अशा मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिवसेनेच्या मधल्या फळीतील नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा गनिमीकावा कसा काम करेल या याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -