घरदेश-विदेशआज फैसला

आज फैसला

Subscribe

राज्याची उत्सुकता शिगेला पोहोचली

नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, सुजय विखे, सुनील तटकरे,
प्रकाश आंबेडकर, समीर भुजबळ, सुभाष भामरेंवर लक्ष!

सुमारे दीड महिन्यांचा सतराव्या लोकसभा निवडणुकीचा सोहळा १९ मे रोजी संपला. त्याच दिवशी आलेल्या एक्झिट पोलच्या निकालांनी काहींच्या हृदयाचा ठोका चुकला, तरी काहींना हर्षवायू झाला. हे निकाल चुकीचे ठरोत म्हणून गेले चार दिवस काहींनी देव पाण्यात ठेवले, तर खर्‍या निकालाआधीच काहींनी मिठाईची ऑर्डरही दिली. देशातील सुमारे सव्वाशे कोटी जनता ज्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होती तो मतमोजणीचा दिवस आज उजाडला. आता अपेक्षा आहे ती निकालाची. पहिला, दुसरा… क्रमाक्रमाने येणारे निकाल, जनतेच्या इच्छा आकांक्षाने कोण राज्य करणार आहे हे निश्चित करणार आहेत. म्हणूनच या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेले दोन महिने चांद्यापासून ते बांद्यापर्यन्त लोकसभा निवडणुकीची एकच धामधूम होती. या धामधुमीत राज्यातील प्रमुख लढतींच्या निकालाचे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना अखेर गुरुवारी याचे उत्तर मिळणार आहे. या रणधुमाळीत नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, सुनील तटकरे, समीर भुजबळ या दिग्गजांसह युवा उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या निकालाकडे सार्‍या राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांचा नागपूरमधून विजय सोपा वाटत असताना भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आणि राज्याचे नव्हे तर सार्‍या देशाचे लक्ष या लढतीकडे लागले. पटोलेंमुळे मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैत्यन्य आले. एकूणच राज्याचे सर्व निकाल येण्यासाठी उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जात आह

- Advertisement -

पटोले यांनी गडकरींना लक्ष्य न करता मोदी आणि भाजपची पिसे काढताना वातावरण भाजपविरोधी केले. हे करताना दलित, मुस्लिम आणि बहुजन मतदार संघ आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. पटोलेंना मिळालेल्या प्रतिसादावरून गडकरींची जागा धोक्यात आली असल्याचे मोठे चित्र निर्माण झाले होते. मात्र वंचित आघाडीमुळे अल्पसंख्याक मतांची झालेली विभागणी आणि शहरी मतदारांनी गडकरी यांच्यावर दाखवलेला विश्वास पाहता पटोले आधीपासून म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा प्रचंड मोठा विजय आता तरी कागदावर दिसत आहे. गंमत म्हणजे पटोले हे निकालाच्या आदल्या दिवशी लाखांच्या फरकाने विजयी होणार हे छातीठोकपणे सांगत आहेत.

बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपने प्रतिष्ठेची केली होती. शरद पवारांचा बालेकिल्ला उध्वस्त करून राज्यातील जनतेला एक वेगळा मेसेज देण्याचा भाजपने आपली सारी यंत्रणा कामाला लावली. राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून होते. बारामतीची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हवी, असे थेट केंद्रातून आदेश असल्याने सत्ताधार्‍यांनी आपली सारी ताकद पणाला लावली. खरेतर भाजप स्वतः शरद पवार माढामधून निवडणूक लढवण्याची वाट पाहत होते. पवारांना पराभूत करून भाजपला झंझावात निर्माण करायचा होता, पण चाणाक्ष पवारांनी वारा कुठल्या दिशेने वाहत आहेत, याचा वेळीच अंदाज घेऊन माघार घेतली आणि भाजपला संधी दिली नाही.

- Advertisement -

नगर यंदा लोकसभेतील सर्वात लक्षवेधी जागा ठरली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मुलासाठी डॉ. सुजय यांच्यासाठी प्रतिष्ठेेची जागा करून शेवटी विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडले. मात्र जागा सोडली नाही. शरद पवार यांनी आपले जुने हिशोब चुकते करण्यासाठी विखेंचे मनसुबे उधळून लावताना कोणत्याही परिस्थितीत नगरची राष्ट्रवादीकडे असलेली जागा न सोडण्याचा निर्णय घेतला. हे करताना त्यांनी थेट राहुल गांधी यांच्याकडे ही जागा आपल्यासाठी महत्वाची असल्याचे पटवून दिले. शेवटी चारी बाजुंनी कोंडी झालेल्या विखेंना सुजय यांना भाजपमध्ये पाठवण्यावाचून पर्याय उरला नाही. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस विखेंविरोधात एकत्र आले असले तरी ही जागा सुजय जिंकणार असे चित्र दिसत आहे.

सातार्‍याचे उदयनराजे यांचा विजय निश्चित समजला जात आहे. त्यांच्या विरोधात भाजपने राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांना फोडून उभे केले. मात्र राजकीय विचारवंत भले उदयनराजे यांना फारसे गंभीर घेत नसले तरी जनमानसात प्रचंड लोकप्रिय असलेल्या उदयनराजे यांना साम, दाम, दंड, भेद वापरून भाजप प्रमाणे निवडणूक जिकण्याची कला अवगत असल्याने त्यांच्या विज यात कोणी आडवे येईल, असे आज तरी वाटत नाही.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर तिसर्‍या आघाडीचा मोठा पर्याय निर्माण करणारे डॉ. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन जागेवरून उभे राहिले असून यापैकी सोलापूरची जागा ही महत्वाची असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाटेतील ते काटे बनले आहेत. मागच्या वेळेस मोदी लाटेत पराभूत झालेले शिंदे यांना यावेळेस विजयी होतील, असे वातावरण होते. या लढतीतील विचित्र निकाल म्हणजे शिंदे वि. आंबेडकर या लढतीत भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर यांची लॉटरी लागण्याची शक्यता वाटते. रायगडमधून मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुनील तटकरे १८०० मतांनी पराभूत झाले होते. यावेळी मात्र प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना त्यांनी पुढे सरकण्याची शेवटपर्यंत संधी दिलेली नाही. ही जागा तटकरे जिंकतील तर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना धुळ्यात विजय मिळणे कठीण वाटत आहे.

नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेऊन पुन्हा एकदा आपले पुतणे समीर भुजबळ यांना उभे केले असले तरी मागच्या वेळेप्रमाणे यंदाही त्यांची डाळ शिजणार नाही.

केंद्रातील सत्तेचा मार्ग हिंदी भाषिक पट्ट्यातून

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडवर लक्ष

गुरुवारी लोकसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालात सर्वात महत्त्वाची भूमिका देशातील ‘हिंदी भाषिक पट्टा’ बजावणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमध्ये जो पक्ष अथवा राजकीय आघाडीला जास्त जागा मिळणार त्याची सत्ता दिल्लीत येणार हे नक्की आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत या हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे देशात भाजपची सत्ता आली होती. आज येणार्‍या निकालाकडे म्हणूनच सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

या हिंदी भाषिक पट्ट्यात सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशात आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्र पक्षांनी मिळून ७२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे केंद्रात भाजपची सत्ता होती. उत्तर प्रदेशाचे हे महत्त्व लक्षात घेऊन या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि महागठबंधनाने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर प्रदेशात आपले सर्व लक्ष केंद्रित होते. तर मायावती आणि अखिलेश यादव यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात जोरदार रॅली केल्या होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही रोड शो, सभा घेत काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश खालोखाल हिंदी भाषिक पट्ट्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे राज्य म्हणजे बिहार. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत.

२०१४ साली बिहारमध्ये भाजपला २२, भाजपचा मित्र पक्ष, पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला ६ तर कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला ३ जागा मिळाल्या होत्या. अशा एकूण एनडीएला ३१ जागा मिळाल्या. यावेळी कुशवाह यांचा पक्ष एनडीएत नसला तरी जनता दल (संयुक्त) एनडीएत आला आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे पारडे जड आहे. मात्र दुसर्‍या बाजूला लालू यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनेही बिहारमध्ये जोरदार प्रचार केला आहे.

या खालोखाल राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड ही तीन राज्ये आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यात २०१४ मध्ये भाजपने मोठी कामगिरी केली होती. २०१४ मध्ये राजस्थानमधील सर्वच्या सर्व म्हणजे २५, गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६ आणि मध्य प्रदेशातील २९ पैकी २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. अशाप्रकारे ७७ जागा भाजपने याच राज्यांमधून जिंकल्या आहेत. तर झारखंडमधील १४ पैकी १२ जिंकून आपले स्थान भक्कम केले होते. यावेळी ही राज्ये कोणाच्या बाजूने उभी रहातात यावर अंतिम विजेता निश्चित होणार आहे. या हिंदी भाषिक पट्ट्यात यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याचे दिसून येते.सर्व पक्षांच्या प्रचाराचे लक्ष्य ही हिंदी भाषिक राज्ये होती. आता या पट्ट्यात कोण बाजी मारणार हे गुरुवारी निश्चित होणार आहे.

अंतिम निकाल मध्यरात्रीनंतरच, शुक्रवारी उधळणार गुलाल!

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या गुरुवारी सकाळी आठपासून होणार आहे. यंदा मतमोजणी होताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला विलंब होणार आहे. दुपारपर्यंत पहिल्या फेरीचा कल हाती येऊ शकतो.
अंतिम निकाल मध्यरात्रीनंतरच हाती येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील ईव्हीएम मशीन अंबड येथील गोदामात ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी सातला उमेदवारांसमक्ष स्ट्राँगरूम उघडण्यात येईल. त्यानंतर आठपासून मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत.

नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी प्रत्येकी ८४ टेबल याप्रमाणे दोन मतदारसंघासाठी १६८ टेबल लावण्यात आले आहेत. एक फेरी पूर्ण व्हायला सुमारे ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यानुसार नाशिकसाठी २५ आणि दिंडोरीसाठी २७ फेर्‍या होणार आहेत. एका फेरीची मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू केली जाणार नाही. मतमोजणी सकाळी आठला सुरू होईल. प्रत्येक फेरीनंतर उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात येईल. सर्व फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर एकूण मतदानापैकी पाच टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची मते मोजली जाणार आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे. त्यामुळे रात्री एक दोनच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. त्यामुळे विजयाचा गुलाला पहाटेच उधळला जाईल, असा अंदाज आहे. निवडणूक निकालाचा विचार करता शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात मद्यविक्रिची दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

तयारी पूर्ण
मतमोजणीची संपूर्ण प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीकरता सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीकरता नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचे रॅण्डमायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीच्या एक तास आधी अखेरचे रॅण्डमायझेशन केले जाईल. त्यानंतर कर्मचार्‍यास मतमोजणी टेबल कोणता याविषयी माहिती मिळेल. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने रंगीत तालीम घेत मतमोजणी प्रक्रियेतील त्रुटी दूर केल्या.

मुंबईच्या मतमोजणीकडे लागले देशाचे लक्ष 

लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहापैकी जास्त जागांवर जो पक्ष अथवा आघाडी विजयी होते तो पक्ष अथवा आघाडी दिल्लीवर राज्य करते हा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईत होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाण्याचा बालेकिल्ला एनडीए कायम ठेवणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबईतील सहा आणि ठाण्यातील चार मतदार संघ २०१४ सालाप्रमाणेच यावेळीही युती राखणार का, हे गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

मुंबई ज्याची तो पक्ष देशावर राज्य करतो. २००९ साली मुंबईतील सहापैकी पाच जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावर्षी दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युपीए आघाडीची सत्ता होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक घटक पक्ष होता. २०१४ साली मुंबईच्या सहाही जागांवर भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी देशात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारची सत्ता होती. त्यामुळे यावेळी मुंबईवर निर्विवाद वर्चस्व कोण मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसर्‍या बाजूला २०१४ साली ठाण्यात सेनेचे राजन विचारे, पालघरला भाजपचे चिंतामण वनगा आणि पोटनिवडणुकीत पुन्हा भाजपचा राजेंद्र गावित, भिवंडीत भाजपचे कपिल पाटील आणि कल्याणमध्ये शिवसेनेचा डॉ. श्रीकांत शिंदे विजयी झाले होते. या चारही जागा यावर्षी युती जिंकणार की आघाडी विजयी होणार हे गुरुवारी निश्चित होणार आहे.

मुंबईतील सहा लढतींपैकी महत्वाच्या लढतीत दक्षिण मुंबईतील लढत गणली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि नुकतीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्यावर्षी जवळपास एक लाखांहून अधिक मतांनी देवरा यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर यंदा या मतदारसंघासाठी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॅटिंग करीत देवरा यांना मतदानासाठी आवाहन केले होते. त्यामुळे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. तर दक्षिण-मध्य मुंबईत पुन्हा एकदा काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड यांच्यावर विश्वास दाखविण्यात आला आहे. याच मतदारसंघात शिवसेनेकडून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्षांवरुन थेट खासदारकीपर्यंत मजल मारलेले राहुल शेवाळे यंदाही बाजी मारतील का? याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात ही मनसे फॅक्टर प्रामुख्याने असल्याने राजकीय विश्लेषकांचे लक्ष या मतदारसंघावर अधिक असणार आहे.

शिवसेनेवर टीका केल्याने यंदाची उमेदवारी गमवावी लागलेल्या किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबईतून कोणाची वर्णी लागते हे पाहणे ही उत्सुकतेचे ठरणार आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतील एकमेव जागेवर संजय दिना पाटील हे उमेदवार म्हणून रिंगणार आणण्यात आले. त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने पूर्ण ताकद या मतदारसंघात पणाला लावली होती. तर त्यांच्या विरोधात भाजपने महापलिकेतील गटनेते पदावरुन थेट खासदारकीसाठी मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी कोण विजयी होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याबरोबरच भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभळणार्‍या आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची कन्या पुनम महाजन यंदा दुसर्‍यांदा खासदारकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत.त्यांना काँग्रेसच्या प्रिया दत्ता यांचे आव्हान आहे. तर हट्टाहासापोटी उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवारीचे तिकीट आपल्या पदरात पाडून घेणारे संजय निरुपम हे गजानन किर्तीकर यांना कडवी लढत देतील, असे अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविले आहेत.

मतमोजणी प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची यंत्रणा याची तयारी करत असून या प्रक्रियेची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही त्रुटी जाणवल्या. त्याबाबत तातडीने अधिकार्‍यांना सांगून त्या दूर करण्यात आल्या असून मतमोजणीकरता प्रशासन सज्ज आहे. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी,नाशिक.

आगामी २४ तास खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क आणि दक्ष रहा. घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. –राहुल गांधी,अध्यक्ष, काँग्रेस

ईव्हीएमचा विरोध हा देशाच्या जनतेच्या भावनांचा अनादर आहे. पराभवामुळे अस्वस्थ झालेले हे २२ पक्ष लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून जगात लोकशाहीची प्रतिमा मलिन करत आहेत. -अमित शहा, अध्यक्ष, भाजप

मतदानानंतर जे एक्झिट पोल दाखवण्यात आले ती एक नौटंकी आहे. खरे चित्र २३ मे रोजी समोर येईल. यावेळी एक्झिट पोल खोटे ठरतील असे वातावरण राज्यात आणि देशात आहे .-शरद पवार ,अध्यक्ष ,राष्टवादी 

एक्झिट पोल हे ईव्हीएम मशीनमधून घेण्यात आले आहेत का? मी एक्झिट पोलवर कधीच बोलत नाहीत. पण आता काही तासच उरले आहेत त्यामुळे थो़डे थांबा, निकाल या पेक्षाही अजून चांगले येतील. -उद्धव ठाकरे,पक्षप्रमुख,शिवसेना

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ जागांवर विजयी होेऊ शकते. २३ मेनंतर एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. निवडणुकीनंतर आम्ही सेक्युलर पक्षांसोबत राहू. -प्रकाश आंबेडकर,प्रमुख वंचित आघाडी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -