घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टमनसेच्या इंजिनाने हाताला बळ

मनसेच्या इंजिनाने हाताला बळ

Subscribe

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याचे मतदान हे उमेदवाराच्या विजयाचे तिकीट कन्फर्म करू शकते. लोकसभा निवडणुकीत मनसेने मोदी आणि शहा विरोधी भूमिका घेतली आहे.त्यामुळे मनसेचे इंजिन मतदारांचे किती आरक्षित डब्बे हे काँग्रेससाठी आरक्षित करणार यावर उमेदवाराचा विजय अवलंबून असणार आहे. युतीच्या उमेदवाराला मतदान करायचे नाही या मनसेच्या पवित्र्यामुळे काँग्रेसमध्ये यंदा निवडणुकीसाठी नवचैतन्य आले आहे. पण मनसेच्या वाट्याची किती मते कोणाला फिरतात यावर विजयाचे गणित निश्चित आहे. गेल्या लोकसभेत मनसेला मतदान केलेल्या मतदाराला काँग्रेस मनसे कॉम्बो ऑफर रूचते का? यावरही विजयाचे समीकरण अवलंबून आहे.

यंदा दक्षिण मध्य मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे उतरल्याची छायचित्रे व्हायरल झाली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीच युतीच्या विरोधाची भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे या मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांच्याविरोधात मनसे उभी ठाकली आहे. त्यामुळे मनसेची ही भूमिका एकनाथ गायकवाड यांच्या पथ्थ्यावर पडलेली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना यंदाच्या प्रचारात हाताशी धरले आहे. अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, मानखुर्द आणि सायनमधील दलित मुस्लीम मतदार आपल्याकडे वळवणे यासाठी दोन्ही पक्षांतून कसून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या माहीममध्येही मनसेचे मतदार आपल्याकडे वळतील का यासाठी राहुल शेवाळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेनेही काँग्रेसला पाठिंबा देत माहिममध्ये समीकरण बदलाचे संकेत दिले आहेत. पण मनसेचा निर्णयाचे स्वागत होईल का ? हे एकनाथ गायकवाड यांना होणार्‍या मतदानातूनच दिसणार आहे.

पक्षातील जेष्ठ नेते म्हणून एकनाथ गायकवाड यांच्या पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. एकनाथ गायकवाड यांच्यासोबतच डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचेही नाव याठिकाणी चर्चेत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या सभेतही दक्षिण मध्य मुंबईतील धारावीतील लघु उद्योजकांचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. त्यामुळे धारावी यंदाच्या निवडणुकीचाही कळीचा मुद्दा आहे. धारावी पुर्नविकासाच्या निविदेला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदाही धारावीचे स्वप्न हे प्राधान्यावर असणार आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे माहुलवासीयांच्याा पुनर्वसनाचा प्रश्न हा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला कोंडीत टाकणारा असा आहे. यंदाच्या लोकसभेसाठी 31 उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले यांनाही तिकीट मिळाले आहे. तसेच कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली न लढणार्‍या उमेदवारांची संख्याही महत्वाची अशी आहे.

1 लाख मतांचा धनी कोण ?

मनसेचे आदित्य शिरोडकर यांना 73 हजार इतके मतदान झाले होते. तसेच आम आदमी पक्षाचे सुंदर बालाकृष्णन यांना 27 हजार 687 मतदान झाले होते. तर नोटाचा वापर हा 9 हजार 571 जणांनी केला होता. मनसेने लोकसभेतून माघार घेतली आहे. आम आदमी पक्षाची क्रेझ आणि मुंबईसह महाराष्ट्रातील अस्तित्व संपल्यात जमा आहे. त्यामुळे ही जवळपास एक लाख मते कोणाला मिळणार यावर विजयाचा मॅजिक फिगर अवलंबून आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -