घरमुंबईभिवंडीत मैंदे ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

भिवंडीत मैंदे ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Subscribe

भिवंडी येथील मैंदे ग्रामस्थांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रचारासाठी कोणाला गावामध्ये प्रवेश करू देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

रस्ता, पाणी नसलेल्या गावातील दृष्टचक्र निवडणुकीच्या तोंडावर सुध्दा न संपल्याने भिवंडी तालुक्यातील मैंदे गावातील आदिवासी पाड्यांवरील खेडुतांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नुकताच ग्रामस्थांच्या सभेत घेतला आहे. तानसा पाईपलाईन लगतचे तालुक्यातील शेवटचे गाव असलेले ग्रुप ग्रामपंचायत मैंदे अंतर्गत असलेल्या ताडाची वाडी, बेहडे पाडा, बीज पाडा, बातरे पाडा, रावते पाडा या सुमारे १३०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी पाड्यावर जाण्यास रस्ता आणि पिण्याचे पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांनी आपल्या समस्या शासन दरबारी, लोकप्रतिनिधी समोर कित्येक वेळा मांडून ही त्या समस्या दूर करण्याबाबत आज पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हताश ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या समस्येला वाचा फोडल्यानंतर स्थानिक खासदार कपिल पाटील आमदार शांताराम मोरे यांनी माहितीची दखल घेत गावास भेट देत येथील समस्या पावसाळा थांबताच दूर करण्याचे आश्वासन दिले होते.

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

भिवंडी तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पाईपलाईन लगतची ग्रुप ग्रामपंचायत मैंदे असून त्यामध्ये असलेल्या पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना पावसाळ्याच्या चार महिन्यात गुढघा भर पाण्यातून चिखल तुडवीत आपले घर गाठावे लागते. तर या पाड्यांवरील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणा पुढील शिक्षण घेण्यासाठी शहापूर तालुक्यातील पिवळी येथील माध्यमिक शाळेत नदी ओलांडून जीव धोक्यात घालून जावे लागते. तर या पाड्यांवर पिण्याचे पाणी नसल्याने अक्षरशा खड्ड्यातील गढुळ पाणी येथील महिला वापरतात. त्यामुळे येथील ग्रामस्थ हवालदिल असताना या समस्येला माध्यमांनी वाचा फोडून येथील वास्तव जनतेसमोर आणले होते. त्यानंतर या बातमीची दखल घेत खासदार कपिल पाटील, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांनी मैंदे या गावास तात्काळ भेट देत तेथील समस्या जाणून घेत त्याच्या निवारणासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु पावसाळा संपाला तरी त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा ग्रामस्थांनी तहसीलदार याना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला असता ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांना तात्काळ पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, यांच्या माध्यमातून ज्या सुविधा तात्काळ देता येतील त्या देण्याचे सांगितल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करीत वाट पहिली. परंतु आज हि या ठिकाणी कोणतेही रस्त्याचे अथवा पिण्याचे पाणी याची व्यवस्था न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती ग्रामस्थ एकनाथ पाटील यांनी दिली आहे .

- Advertisement -

प्रचारास येणाऱ्यांना रोखणार

या पाड्यांवरील ग्रामस्थांना गावा जवळून मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन जात असून सुध्दा येथील महिलांना थेंब थेंब पाणी जमविण्यासाठी चार चार तास झगडावे लागते. तर कित्येक वेळा गढुळ पाणी आपल्या वापरासाठी गाळून घ्यावे लागते. अशीच परिस्थिती राहिल्यास पुन्हा येत्या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना त्याच समस्येला सामोरे जावे लागणार असून त्यामुळे ग्रामस्थांचा शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनीधी यांच्या वरील विश्वास उडाला असून हतबल ग्रामस्थांनी त्याविरोधात आपला संताप व्यक्त करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्यास सर्व ग्रामस्थांसह महिलांनी पाठिंबा देत बहिष्कारावर कायम राहत निवडणुकीच्या प्रचारासाठी गावातील पाड्यांवर येणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना गाव बाहेरच रोखणार असल्याचा निर्धार बेबी दवे आणि मंजुळा बरडे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -