घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टकेंद्रातील सत्ताधारी वि. जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांशी कडवी लढत

केंद्रातील सत्ताधारी वि. जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांशी कडवी लढत

Subscribe

हितेंद्र विरुद्ध देवेंद्र लढतीवर सर्वांची नजर

केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-सेनेची जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांशी पालघर लोकसभा मतदार संघासाठी कडवी लढत होणार आहे.युतीच्या उमेदवारासाठी राज्यमंत्र्यांसह अनेक मुख्यमंत्री प्रचारात उतरले असताना,महाआघाडीच्या बळीराम जाधव यांच्यासाठी मात्र, तीन स्थानिक आमदार आणि महापौर प्रचार करीत आहेत. 2009 साली स्थापन झालेल्या पालघर जिल्हा लोकसभेची पहिली निवडणूक त्याचवर्षी झाली होती.त्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी 2 लाख 23 हजार 234 मते मिळवून भाजपच्या चिंतामण वनगा यांचा 12 हजार 360 मतांनी पराभव केला होता.त्यानंतर 2014 ला मोदी लाटेत चिंतामण वनगा यांनी 5 लाख 32 हजार 996 मते मिळवत बळीराम जाधव यांची तब्बल 2 लाख 39 हजार 788 मतांनी दणदणीत पराभव केला.

वनगा यांच्या अकाली निधनानंतर 2018 मध्ये पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना भाजपने उमेदवारी दिली होती.या निवडणुकीत युती तुटल्यामुळे शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती.तर ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली होती.त्यामुळे या पोट निवडणुकीत तिरंगी लढत होवून तिन्ही उमेदवारांनी दोन लाखांच्यावर मते मिळवली. बळीराम जाधव यांनी 2 लाख 19 हजार 872,श्रीनिवास वनगांना 2 लाख 41 हजार 191 मते मिळाली.तर राजेंद्र गावित यांनी मात्र अडीज लाखांचा टप्पा ओलांडून( 2 लाख 69 हजार 802) विजय मिळवला.

- Advertisement -

या निवडणुकीनंतर वर्षभरात या मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.सेनेने भाजपाशी युती करून पालघरची जागा मागून घेतली.त्यामुळे खासदारकी गमावण्याची पाळी आलेल्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे शिवबंधन घालून उमेदवारी मिळवली आहे. तर मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने गावित यांना आपलेच मानून पहिल्यांदाच शिवसेनेच्या उमेदवाराचा तन-मन-धनाने प्रचार सुरू केला आहे.या युतीला आरपीआय,श्रमजीवी संघटना,रासप व रयत क्रांती संघटनेने पाठींबा दिला आहे.गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते बांधकामंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख आ.रविंद्र फाटक,भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण पालघरमध्ये तळ ठोकून बसले आहेत.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ प्रचारसभा घेणार आहेत.

गावित यांचा प्रचार मंत्र्यांच्या फौजेद्वारे केला जात असताना, महाआघाडीचे बळीराम जाधव यांची भिस्त आमदार हितेंद्र ठाकुर यांच्यावर आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,माकप,जनता दल (से.),आरपीआय(कवाडे गट),दलित पँथर,भाकप,शेतकरी कामगार पार्टी अशा विविध पक्षांची महाआघाडीची बलाढ्य भाजपशी कांटेकी टक्कर होणार आहे.या महाआघाडीच्या बळीराम जाधव यांचा आमदार हितेंद्र ठाकुर,आमदार क्षितीज ठाकुर,विलास तरे,महापौर रुपेश जाधव,माजी महापौर प्रविणा ठाकुर, राजीव पाटील प्रचार करीत आहेत.

- Advertisement -

पोटनिवडणुकीतील आकडेवारीनुसार सेना-भाजपकडे पाच लाखांहून अधिक मते आहेत.तर बविआकडे फक्त सव्वा दोन लाख मते आहेत.त्यामुळे तीन लाखांचा फरक भरून काढण्याची कसरत महाआघाडीला करावी लागणार आहे.आघाडीच्या मूळ मतांमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,माकपसह मित्रपक्षांच्या मतांची भर पडणार असल्यामुळे हा फरक निश्चितच भरून निघेल असा विश्वास आघाडीकडून व्यक्त करण्यात येत आहे.तर दुसरीकडे आयता आलेला उमेदवार असल्यामुळे गावितांबद्दल सेनेत काहीशी नाराजी आहे.त्यामुळे युतीची मते कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे बळीराम जाधव आणि राजेंद्र गावित यांच्यात कडवी लढत होणार आहे.

बविआची शिट्टी निशाणी गुल करून युतीने कुरघोडी केली होती.मात्र,बविआला रिक्षा निशाणी मिळाल्यामुळे युतीचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे.निवडणुकीत सर्वात स्वस्त आणि कायम उपलब्ध होणारे वाहन म्हणून रिक्षाचा वापर केला जातो.त्यामुळे बविआची निशाणी घरोघरी पोहोचली आहे.तर दुसरीकडे हे वाहन युतीला वापरता येत नसल्यामुळे त्यांची गोची झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक गुंडगिरी संपवण्याचे वक्तव्य पोटनिवडणुकीत केले होते.हेच वक्तव्य उद्धव ठाकरे यांनीही वसईतील दौर्‍यात केले होते.त्यावर उत्तर देताना षंढापेक्षा गुंड बरे असा टोला लगावून हितेंद्र ठाकुर यांनी आव्हान दिले होते.त्यामुळे देवेंद्र विरुद्ध हितेंद्र अशी पालघरची निवडणूक असल्याची चर्चा केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -