घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टगृहीत राजकारणाची कोंडी फुटणार ?

गृहीत राजकारणाची कोंडी फुटणार ?

Subscribe

बालेकिल्ला राखण्याचे युतीपुढे आव्हान

नवी मुंबईचा अपवाद वगळता वाहतुकीची समस्या, बेकायदा आणि बकाल वस्त्यांची भाऊगर्दी, पाण्यासारख्या मुलभूत सुविधांची कमतरता ही ठाणे लोकसभा मतदार संघाची अवस्था आहे. राज्यात सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असलेल्या या परिसरातील नागरिकांना राज्यकर्त्यांनी केवळ विकासाची स्वप्ने दाखवली. प्रत्यक्षात मात्र ती सारी मृगजळच ठरली. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यात २०१४ मध्ये नमो लाट असल्याने राजन विचारे इथून सहजपणे निवडून आले.

आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता कुठलीही लाट नाही. राष्ट्रवादीने एक सुशिक्षीत आणि अभ्यासू खासदार अशी ओळख असणार्‍या आनंद परांजपे यांना ठाण्यातून राजन विचारे यांच्या विरोधात उभे केले आहे. आनंद परांजपेंच्या कितीतरी आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत आलेल्या गणेश नाईक यांनी नवी मुंबईतून आपली सारी ताकद परांजपेंच्या पाठीशी उभी केली आहे. मीरा-भाईंदरमध्येही नाईक कुटुंब जातीने लक्ष देऊन आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील गावठाणांमधून सत्ताधारी शिवसेनेविषयी असंतोष आहे. तो प्रचारकाळात उघडपणे दिसून आला.

- Advertisement -

जुन्या ठाण्यातील इमारतींचा पुनर्विकास राज्य शासनाने रखडवल्याने विस्थापित झालेले भाडेकरू नाराज आहेत. ‘सरकारला धडा शिकविण्याची संधी’ यादृष्टिकोनातून ते या निवडणुकीकडे पाहत आहेत. शहरातील मनसे कार्यकर्तेही युतीविरोधात मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. काही रिपाइं कार्यकर्त्यांनी नेत्यांचे आदेश धुडकावून युतीविरोधात बंड पुकारले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे रविंद्र फाटक यांचा भाजपचे संजय केळकर यांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही नौपाडा विभागातील संपूर्ण पॅनल निवडून आणत भाजपने सेनेला धूळ चारली होती. त्यातून एकप्रकारे आम्हाला कोणत्याही प्रकारे गृहीत धरू नये, असा संदेशच ठाणेकरांनी शिवसेनेला दिला होता. आताही तीच भीती सेनेच्या गोटात आहे. कारण राजन विचारेंच्या तुलनेत आनंद परांजपे सुशिक्षीत आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दा वारंवार अधोरेखित केला जात आहे. त्यावर शिवसेनेने आमचा उमेदवार सुसंस्कृत असल्याचे सांगण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढील आव्हान वाढले आहे. शिवसेनेतील सुप्त गटबाजी, भाजप कार्यकर्त्यांसोबत असलेला विसंवाद मिटवून सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आदींची त्यांना साथ आहे. शिवसेनेकडे निवडणुकीत काम करणारी शिस्तबद्ध यंत्रणा आहे. त्याच्याआधारे बालेकिल्ल्याचा अभेद्यापणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. क्लस्टर डेव्हलमेंट, मेट्रो प्रकल्प, उड्डाण पूल आदी विकास कामांच्या भांडवलावर शिवसेना-भाजप युती पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन करीत आहे. निवडणूक दिल्लीतील उमेदवार निवडून देण्यासाठी असली तरी वचनपूर्ती कार्य अहवालात अनेक महापालिका आणि राज्य शासनाच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. एवढे मात्र नक्की यंदा ठाणे कल्याणइतके सोपे नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -