मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरे सगल चार दिवस सभा घेणार आहेत. उद्या, २३ एप्रिल रोजी मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात त्यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर २४ एप्रिलला भांडूपमध्ये, २५ एप्रिलला कामोठे, पनवेल आणि २६ एप्रिलला नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहीर सभांचा तपशील. #मोदीशाहीमुक्तभारत pic.twitter.com/04d6DVvWJZ
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 22, 2019
‘लाव रे तो व्हिडीओ’ आता मुंबईत
राज ठाकरे यांनी आतापर्यंत राज्यात नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेतल्या आहेत. या सभांमधून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष केले आहे. व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे कोणता व्हिडीओ दाखवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उद्या, मुंबईत सभा
दरम्यान, मुंबईत २४ तारखेला राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मिळावी, यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजनें’तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. त्यानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांनी मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती. परंतु आता राज ठाकरे यांच्या सभेला २४ तारखेऐवजी २३ तारखेला परवानगी देण्यात आली आहे.