घरमुंबईतरुण नेत्यांना भाजपकडून पदांचे लॉलीपॉप

तरुण नेत्यांना भाजपकडून पदांचे लॉलीपॉप

Subscribe

सत्ता असूनही राज्याच्या राजकारणात फारशी प्रगती साधता येत नसल्याचे लक्षात आल्याने आता इतर पक्षातल्या नेत्यांना आणि त्यांच्या मुलांना आपलेसे करण्याकडे भाजपचा कल आहे. पाच राज्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर या मोहिमेने विशेष जोर धरला आहे. भाजपचे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांच्या मागे लागले आहेत. पण त्यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद मिळत नाही, असे पाहून भाजपने त्यांच्या मुलांवर जाळे फेकण्याचा प्रयत्न चालवलाय. एकीकडे दोन्ही काँग्रेस पक्षांकडून प्रतिसाद नसल्याचे पाहून सेनेकडेही नेत्यांच्या नजरा गेल्या आहेत. यात काही विद्यमान मंत्रीही असल्याची माहिती पुढे आली आहे. तरुण नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करून भाजपकडून काँग्रेसची नैतिक ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

येणार्‍या राजकीय अडचणी लक्षात घेऊन भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू केला आहे. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान बबनराव पाचपुते, सुनील देशमुख, डॉ. विजय गावित, राम ठाकूर अशा अनेकांना आपल्याकडे घेऊन भाजपने राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या ४२ जणांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यातील ३० जण विजयी झाले. यांच्याच मदतीने राज्यात भाजपला सत्ता स्थापन करता आली. मात्र यावेळी सत्तेचे काय होईल, हे भाजप नेते सांगू शकत नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या भाजपबहुल पाच राज्यांच्या निवडणुकीत हातची तीन राज्ये निसटली. मतदारांच्या या बदलत्या कलाचा फटका महाराष्ट्रातही बसण्याची भीती भाजपला आहे. त्यातच शिवसेनेने भाजपबरोबर काडीमोड घेण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळवायची असल्यास निवडून येणार्‍या विरोधी नेत्यांना आपल्याकडे घेण्यावाचून पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर या नेत्यांना फूस देऊन आपल्याकडे घेण्याचे जोरदार प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.

- Advertisement -

तथापि भाजपचा जोर आता ओसरत असल्याचे लक्षात आल्याने ज्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यापैकी एकही नेता भाजप नेत्यांच्या वळचणीला आला नाही. यामुळेच आता या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे. या तरुण नेत्यांना भाजपने विविध पदांची लालूच दाखवली आहे. यात महामंडळांबरोबरच मंत्रीपदांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. नगरचे राजकारणात ज्या विखेपाटील घराण्याच्या अवती भोवती फिरत आहे, त्या घराण्यातच फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपने खूप महिन्यांपासून सुरू केले आहेत. विखेंचे पुत्र सुजय पाटील यांनी तर वडिलांना संबोधूनच काँग्रेस पक्षातच राहिले पाहिजे, असे नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. वडील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसने नेते असूनही सुजयच्या या वक्तव्यांनंतर विखेंच्या घरात राजकीय वैर निर्माण झाले आहे. विखेंप्रमाणेच सोलापूरचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कन्यका असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनाही भाजपत येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी तो स्पष्टपणे फेटाळून लावला. अकलूजचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंग यांच्यावरही भाजप नेत्यांनी खडा टाकून पाहिला. पण ते बधले नाहीत.

सोलापूरचे सेनेचे तत्कालीन खासदार प्रतापसिंग मोहिते यांचे पुत्र धवल हे सेनेच्या उमेदवारीचे स्पर्धक आहेत. धवल यांची स्थानिक राजकारणातील उठबस लक्षात घेता या मतदारसंघात त्यांची उमेदवारी फलदायी ठरेल, हे लक्षात घेत भाजपने धवल यांना भाजपत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. इकडे मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातील काँग्रेसच्या ताकदवान उमेदवार प्रिया दत्त यांच्या उमेदवारीची घोषणा होत असतानाच त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे. प्रिया यांच्या या घोषणेमागेही भाजपनीती असल्याची चर्चा आहे. भाजपच्या युवामोर्चा अध्यक्ष असलेल्या प्रमोद महाजन यांच्या कन्यका पुनम महाजन यांचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी भाजपने प्रिया यांच्यावर दबाव आणल्याचे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. नागपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनाही गाठत भाजपत येण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न करण्यात आला.

- Advertisement -

विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्या पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय प्रमुख नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल यांच्याकडेही भाजपत येण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. पण कुणाल यांनीही स्पष्ट नकार दिला. मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांचे पुत्र नरेंद्र मोहन यांनाही खेचण्याचा प्रयत्न झाला. त्या बदल्यात ईडीच्या चौकशीतून बाहेर काढण्याचा शब्द नरेंद्र यांना देण्यात आला होता, असे सांगण्यात आले. विदर्भातील आणखी एक वजनदार नेते विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल यांच्यावरही जाळे फेकण्यात आले होते. पण त्यांनीही नकार कळवल्याचे समजते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पाहिले. तेव्हा नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. यामुळे नाईकांच्या प्रवेशाचा विषय संपला. पण आता त्यांचे आमदार पुत्र संदीप नाईक यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न झाले. पण तेही फोल ठरले.

ज्यांच्यावर भाजपची नजर आहे
डॉ. सुजय विखेपाटील
आमदार प्रणिती शिंदे
आमदार संदीप नाईक
सलील अनिल देशमुख
कुणाल नितीन राऊत
नरेंद्रमोहन कृपाशंकर सिंह
चिराग धवल प्रतापसिंह
विशाल विलास मुत्तेमवार
डॉ. अमोल रणजित देशमुख

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -