दिवाळीच्या खरेदीसाठी नकार देणाऱ्या प्रेयसीवर प्रियकराचा हल्ला

Mumbai
crime scene in Mumbai
प्रातिनिधिक छायाचित्र

दिवाळीच्या खरेदीसाठी येण्यास नकार देणाऱ्या विवाहित महिलेवर प्रियकराने घरात घुसून ब्लेडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री भांडुप (प) येथे घडला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विवाहितेला उपचारासाठी मुलुंड सर्व सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुप्रिया (२६, काल्पनिक नाव) ही पतीच्या निधनानंतर ७ वर्षांचा मुलगा आणि वडिलांसोबत भांडुप (प) येथे राहत आहे. विक्रोळी येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करणारी सुप्रियाचे ३ वर्षांपूर्वी घाटकोपर रमाबाई नगरमध्ये राहणाऱ्या पंकज सातपुते या तरुणासोबत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

बुधवारी सायंकाळी पंकज हा सुप्रियाच्या घरी आला आणि तिला दिवाळीची खरेदी करण्यासाठी जाऊया, असे सांगत तिला सोबत येण्यासाठी बळजबरी करू लागला. मात्र सुप्रियाने त्याच्या सोबत येण्यास नकार दिला असता तो रागाने निघून गेला.त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास पंकज भांडुप येथे सुप्रियाच्या घरी आला आणि त्याने खरेदीसाठी का नाही आलीस? असा जाब विचारत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वतः सोबत आणलेल्या ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली असता पंकजने घाबरून तेथून पळ काढला.

त्याचवेळी बाहेर गेलेले सुप्रियाचे वडील घरी आले आणि त्यांनी घरात जखमी अवस्थेत पडलेल्या सुप्रियाला शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने मुलुंड सर्वसामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याकारणाने डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली जखमी सुप्रियाच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर पंकज सातपुतेच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here