घरमुंबईकेरळला महाराष्ट्राचा मदतीचा हात

केरळला महाराष्ट्राचा मदतीचा हात

Subscribe

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीकरीता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन आणि जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली १०५ डॉक्टरांचे पथक केरळला रवाना झाले आहे. औषध सामग्री घेऊन केरळच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक धावून गेले आहेत.

देवभूमीत वरुण राजाच्या प्रकोपामुळे केरळमध्ये सध्या हाहाकार उडाला आहे. केरळच्या इतिहासातील हा पहिलाच सर्वात मोठा पूर आहे. पूराच्या साचलेल्या पाण्यामुळे या परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती डॉक्टर व्यक्त करत आहेत. त्यामुळे, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आता महाराष्ट्रातील १०० हून अधिक डॉक्टरांची टीम केरळच्या त्रिवेंद्रममध्ये दाखल झाली आहे. हे डॉक्टर आज आवश्यक त्या ठिकाणी जाऊन आरोग्यसेवा पुरवणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील डॉ. संतोष गिते यांनी ‘ आपलं महानगर ‘शी बोलताना दिली आहे.

गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये दाखल

पूरग्रस्त जनतेला उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक डॉक्टरांची टीम केरळमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. या वैद्यकीय पथकामध्ये जे. जे. रुग्णालयातील ५५ डॉक्टर्स आणि पुण्याच्या ससून रुग्णालयातील जवळपास २६ डॉक्टर्स आणि बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील ३० डॉक्टरांचा समावेश आहे. या खास कामासाठी इंडियन एअर फोर्सने दोन विमान पाठवली आहेत. २ वेगवेगळ्या विमानांमधून ही टीम केरळात रवाना झाली आहे.

- Advertisement -

३ ते ४ दिवस पुरेल एवढा औषधांचा, खाद्यपदार्थांचा साठा

केरळमध्ये पडलेल्या पावसाचे पाणी ओसारायला आणखी काही दिवस लागू शकतील. त्यामुळे हे डॉक्टर्स आपल्यासोबतच विमानातून औषधांचा आणि खाद्यपदार्थांचा साठा घेऊन गेले आहेत. त्याचा फायदा या पूरग्रस्तांना होणार आहे. या पूरात २ लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. तर, ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू नये यासाठी महाराष्ट्रातील डॉक्टर्स प्रयत्न करणार आहेत. परिसरात डेंग्यू, मलेरिया किंवा इतर साथीचे आजार पसरु नयेत म्हणून पुढचे ३ ते ४ दिवस पुरेल एवढा औषधांचा साठा या डॉक्टरांच्या टीमकडे आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि उपचारांसाठी खूप मोठा फायदा महाराष्ट्रातील डॉक्टरांचा होणार आहे. विविध क्षेत्रातील डॉक्टर्स सध्या या टीममध्ये सहभागी आहेत.

या ठिकाणी देणार आरोग्यसेवा

“केरळवासियांना मदत करण्यासाठी जवळपास १०० डॉक्टर्स महाराष्ट्रातून दाखल झाले आहेत. ३० डॉक्टरांची एक टीम अशा पद्धतीने ३ वेगवेगळ्या टीम्स आवश्यक त्या सर्वेक्षण करुन, परिस्थिती बघून तिथल्या लोकांना आरोग्यसेवा देणार आहेत. त्रिशूर, एर्नाकुलम आणि पथनमथित्ता या तीन ठिकाणी टीम पाठवल्या जातील. उद्या सकाळपासून या टीम्स कामाला लागतील. कशापद्धतीची सेवा पुरवावी, रुग्णांना कशापद्धतीने हाताळावं हे सर्व जेव्हा लोकांना भेटू तेव्हाच ठरेल. शिवाय, डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरु नयेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. टीममध्ये ५ ते ६ समन्वयक देखील असणार असल्याचे डॉक्टर गीते यांनी सांगितले

- Advertisement -

संपूर्ण देशातून मदतीचा हात

गेल्या १५ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे केरळमध्ये महापूर आला आहे. केरळमध्ये साचलेल्या पाण्यामुळे पूरग्रस्त लोकांचा मुख्य शहरापासून संपूर्णपणे संपर्क तुटला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून केरळच्या पूरग्रस्तांना सध्या मदत पुरवली जात आहे. महाराष्ट्रातील डॉक्टरची टीम आणि पूण्यातून पिण्यासाठी २९ वॅगन पाणी पाठवलं गेलं आहे. शिवाय, देशभरातून अनेक ठिकाणांहून अन्नाची पाकीट पाठवली जात आहे.

१४ पैकी १३ जिल्ह्यात रेड अलर्ट

केरळसह आणखी काही शहरांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास १४ पैकी १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, आणखी नुकसान होऊ नये म्हणून काही भागातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या या टीमद्वारे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येतील. डॉक्टरांच्या या टीममध्ये मेडिसीन, बालरोगज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. यामध्ये रूग्णांची तपासणीही केली जाईल. याशिवाय अजून गरज भासल्यास पुढच्या टप्प्यात म्हणजे दोन-तीन दिवसांत पुढची टीम या ठिकाणी रवाना करण्यात येईल. जेवढे दिवस आवश्यकता असेल तेवढे दिवस सर्व डॉक्टरांची टीम त्या परिसरात आरोग्यसेवा पुरवणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -