दिवाळीपर्यंत निघणार दिवाळं? महागाई कशी असणार ते वाचा

दिवाळीपर्यंत निघणार दिवाळं? महागाई कशी असणार ते वाचा

राज्यात काही दिवसांपासून विविध भागात परतीच्या पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावांमध्ये पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या वेळेला बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं पिक अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. यामुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. तसेच दिवाळीपर्यंत भाजीपाल्यामध्ये दरवाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईच्या घाऊक बाजारात कांदा ६० रुपये प्रतिकिलो तर वाटाणा १५० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याची दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारात देखील दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे विक्रीसाठींच्या मालाची आवक देखील कमी झाली आहे. याचाच परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजारा समितीमध्ये झाला आहे. कांदा, मिरचीसह इतर भाजीपाल्यांची आवक घटली आहे.

बाजारात पाच दिवसांपूर्वी जो कांदा ३५ ते ५० रुपये प्रतिकिलो विकला जात होता. तोच घाऊक बाजारात कांदा आता ६० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. किरकोळ बाजारात कांद्याची किंमत ६० रुपये प्रतिकिलो होती. कांद्याची दरवाढ अशी सुरू राहिली तर ऐन सणासुदीच्या वेळी कांदा रडवण्याची शक्यता असून कांद्याचे प्रतिकिलो दर शंभरी गाठतील. ही दरवाढ दिवाळीपर्यंत अशीच सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान दररोज मुंबई बाजार समितीमध्ये ४०० ते ५०० वाहनं भाजीपाला विक्रीसाठी येत असतात. पण अतिवृष्टीमुळे आता ३७३ गाड्यांची आवक होत आहे.

सध्या नवी मुंबईतील घाऊक बाजारातील दर

भाजी                 किंमत (प्रतिकिलो)
वाटाणा                     १५०
मिरची                   ७० ते ८०
शिमला मिरची              ७०
गवार                        ६५
भेंडी                         ५०
कोबी                        ४०
कारली                      ४०
टोमॅटो                       ३५