महावितरणला मिळणार पवन ऊर्जा

राज्यात १ हजार मेगावॉटची भर

Mumbai
mahavitaran
Mahavitaran

महावितरणच्या एकूण वीज खरेदीमध्ये येत्या दिवसांमध्ये स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा पर्याय वीज ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. महावितरणला १ हजार मेगावॉट इतकी पवन ऊर्जेवर आधारीत वीज ही 2.52 रूपये दराने वीज उपलब्ध होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने यासाठी महावितरणला परवानगी दिली आहे. त्यामुळे महावितरणच्या एकूण वीज खरेदीमध्ये पवन ऊर्जेचा वाटा वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे ऐन उकाड्यात ही वीज उपलब्ध होणार असल्याने महावितरणच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशान्वये महावितरणला एकूण वीज खरेदीत १० टक्केे वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून खरेदी करणे बंधनकारक आहे. त्यामुळेच महावितरणने पवन ऊर्जा खरेदीसाठी १ हजार मेगावॉटसाठीची लघुकालीन प्रक्रिया पार पाडली. ही संपूर्ण प्रक्रिया महावितरणने ऑनलाईन पद्धतीने राबविली. जे पवन ऊर्जा प्रकल्प १९९९ सालापूर्वी कार्यान्वयित झाले आहेत अशा प्रकल्पांसाठी महावितरणने २.२५ रूपये प्रति युनिट दराने वीजखरेदी करण्याचे निश्चित केले होते. तर १९९९ सालानंतरच्या प्रकल्पासाठी २.५० रूपये दराने वीज खरेदीसाठी महावितरणने तयारी दर्शवली होती. आता भर पडलेल्या १ हजार मेगावॉटमुळे महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्पांची स्थापित क्षमता ही ४४५० मेगावॉट इतकी होणार आहे. पवन ऊर्जा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती ही पावसाळ्यात होत असते. या काळात राज्यातील विजेची मागणी कमी झालेली असते. त्यामुळेच पवन ऊर्जा ही शाश्वत ऊर्जा म्हणून तितकीशी वितरण कंपन्यांच्या पसंतीस उतरत नाही. पण महावितरणने आता अल्प मुदतीचे करार केल्याने पवन ऊर्जा वीज प्रकल्पांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणून पाहिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here