घरमुंबई‘शॉपिंग ऑन व्हिल’ साठी पश्चिम रेल्वेचा पुन्हा आटापिटा

‘शॉपिंग ऑन व्हिल’ साठी पश्चिम रेल्वेचा पुन्हा आटापिटा

Subscribe

पश्चिम रेल्वेने ‘शॉपिंग ऑन व्हिल’ अर्थात धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी शॉपिंग योजना सुरु केली होती. मात्र प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने कंत्राटदाराला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेला ही योजना गुंडाळावी लागली; परंतु आता पुन्हा आटापिटा करत रेल्वेने ही योजना सुरू केली आहे. एकूण सहा मेल, एक्स्प्रेसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेतील तृटी दूर करूनच ही योजना कायम सुरू राहिल, अशी आशा आता प्रवासी करत आहेत.

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरु केले आहे. नुकतेच पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये मसाजची सुविधा देण्याची जाहीर केले होत, मात्र प्रवाशांच्या विरोधानंतरही योजना बासनात गुंडाळावी लागली. तर जानेवारी २०१९ पासून पश्चिम रेल्वेने धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी शॉपिंग सुविधा सुरू केली होती.

- Advertisement -

यासाठी पश्चिम रेल्वेने एका खासगी कंपनीला पाच वर्षांचे ३.६६ कोटी रूपयांचे कंत्राट सुध्दा दिले होते. मात्र प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने कंत्राटदाराला मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी कंत्राटदाराने कंत्राट रद्द केले. आता पुन्हा रेल्वेने या योजनेसाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर अंत्योद्य एक्स्प्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस आणि अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्प्रेसमध्ये ‘शॉपिंग सुरूवात केली आहे.

काय आहे शॉपिंग ऑन व्हिल ?
मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यात शॉपिंग ट्रॉलीसह दोन कर्मचार्‍यांमार्फत ट्रेनमध्ये सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचे साहित्य इत्यादी वस्तू विकण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्याकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाइप मशीन याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना विशेष ड्रेस कोड देण्यात आला असून सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत विविध गृहपयोगी साहित्य विकले जाणार आहे.

- Advertisement -

रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, मात्र त्या आधी प्रवाशांची सुरक्षा आणि पायाभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. मात्र त्याद़ृष्टीने रेल्वेचे प्रयत्न होताना दिसत नाही. रेल्वेने अशा योजना सुरू करण्याआधी याकडे लक्ष द्यावे.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -