हिरानंदानी रॅकेट प्रकरणातील मुख्य साक्षीदाराची आत्महत्या

Mumbai
सुंदरसिंग बलवंत मृत साक्षीदार

मुंबईतील पवई येथील प्रतिष्ठित अशा हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेल्या किडनी रॅकेटप्रकरणी हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यासह पाच डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण कुटुंबातील कलह असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

दोन्ही किडन्या खराब झालेला एक रुग्ण उपचारासाठी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याची पत्नी किडनी देण्यास तयार असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात किडनी देणारी ही महिला या रुग्णाची पत्नी नसून ५० लाख रुपयात हा व्यवहार झाला असल्याचा आरोप करत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. बनावट कागदपत्रे तयार करून डॉक्टरांच्या मदतीने हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट चालवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून हॉस्पिटलच्या सीईओसह पाच डॉक्टरांना अटक केली. या सर्व प्रकरणातील प्रमुख साक्षीदार सुंदरसिंग बलवंत हा होता.

सुंदरसिंग मूळचा बिहार येथील रहिवासी होता. तो मुंबई येथे दिव्याच्या ओम साई माऊली अपार्टमेंटमध्ये राहत होता. बिहार या मूळ गावी दोन भाऊ बेरोजगार, दिवा ते गाव या संसाराचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी, आर्थिक चणचण आणि यामुळेच पत्नीशी नेहमीच होणारी भांडणे याला कंटाळून ५ जानेवारी रोजी त्याने गळफास लाऊन आत्महत्या केली. तीन दिवसानंतर या घटनेचा उलगडा झाला. दरवाजा तोडून त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिव्यातील ओम सी माऊली अपार्टमेंटच्या तिसर्‍या माळ्यावरील घरातून काढला.

अडीच वर्षांपूर्वी दिव्यात मित्राकडे राहण्यासाठी आलेला सुंदरसिंग बलवंत हा आपली पत्नी आणि मित्र त्याची पत्नी आणि एक मुलगा असे एकत्र राहत होते. स्वभावाने मनमिळाऊ असलेल्या सुंदरसिंग याला त्याच्या मित्राने आसरा दिला. वर्षभरापूर्वी खोली मालकाला मुंबईत घर मिळाल्याने तो मुंबईत निघून गेला होता.

दरम्यान, दिव्याच्या घरात मृतक सुंदरसिंग आणि त्याची पत्नी राहत होती. घर आणि गावाला पैसे पाठवण्याची मोठी जबाबदारी असल्याने सुंदरसिंग याने दिव्यात पावभाजीची गाडी लावण्यास सुरुवात केली. मात्र, आर्थिक चणचणीमुळे त्याचे व पत्नीचे वारंवार भांडण होत होते. २ जानेवारीला त्यांच्यात भांडण झाले आणि त्याची पत्नी माहेरी निघून गेली. आर्थिक समस्या वाढतच गेल्याने नैराश्य आलेल्या सुंदरसिंग याने गळफास लावून आपल्याच राहत्या घरात आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करून तशी नोंद केली आहे. मात्र, यामागे काही षड्यंत्र आहे का, याचा तपास लवकरच केला जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट चालवले जात असल्याचे आम्ही उघडकीस आणले होते. जी व्यक्ती मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेकरिता या हॉस्पिटलमध्ये आली होती. त्याची पत्नी त्याला किडनी देणार होती. मात्र, मुळात ती त्याची पत्नी नव्हती हे आम्ही सिद्ध केले आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मूत्रपिंड विक्रीचे हे संपूर्ण रॅकेटच असून, ५० लाख रुपयांत हा सर्व व्यवहार होता. मात्र, या प्रकरणाच्या मुख्य साक्षीदाराने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. यामागे काही काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– राजेश पवार, सामाजिक कार्यकर्ते (यांनी हे प्रकरण उघडकीस आणले)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here