घरमुंबईशवपेटी... राखी आणि तिरंगा !

शवपेटी… राखी आणि तिरंगा !

Subscribe

देशासाठी बलिदान देणारे मेजर कौस्तुभ राणे यांच्या शवपेटीवर त्यांची बहीण काश्यपीने राखी आणि चॉकेलटचा बॉक्स ठेवला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना आपला हुंदका आवरता आला नाही. अंत्यसंस्काराची वेळ जवळ आल्यावर सैनिकांनी शवपेटीवरील राष्ट्रध्वज काढून त्याची घडी करून कौस्तुभ यांची पत्नी कणिका यांच्या हाती दिला.

देशासाठी बलिदान देणारे मेजर कौस्तुभ राणे यांच्या शवपेटीवर त्यांची बहीण काश्यपीने राखी आणि चॉकेलटचा बॉक्स ठेवला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना आपला हुंदका आवरता आला नाही. अंत्यसंस्काराची वेळ जवळ आल्यावर सैनिकांनी शवपेटीवरील राष्ट्रध्वज काढून त्याची घडी करून कौस्तुभ यांची पत्नी कणिका यांच्या हाती दिला. त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करून त्यांनी तो छातीशी दोन्ही हातांनी घट्ट धरला. त्यानंतर वडिलांनी पार्थिवाला अग्नी दिला आणि मेजर कौस्तुभ राणे अनंतात विलिन झाले.

जम्मू-काश्मीरमधील बंदीपुरा भागात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना मंगळवारी शहीद झालेल्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सिंधुदुर्गाच्या या वीरपुत्राच्या अत्यंदर्शनासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर कौस्तुभ यांची अंत्ययात्रा निघाली. मेजर कौस्तुभ राणे अमर रहे, हिंदुस्तान जिंदाबाद, अशा घोषणा अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक देत होते. अंत्ययात्रा मीरा रोड स्मशानभूमीत आली. त्यानंतर मेजर कौस्तुभ राणे यांना सैनिकांकडून लष्करी मानवंदना देण्यात आली. त्यांच्या शवपेटीवर लष्करी अधिकार्‍यांनी एकापाठोपाठ एक पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. काही लोकप्रतिनिधींनीही पुष्पचक्र वाहून प्रणाम केला. त्यानंतर कौस्तुभ यांचे जवळचे नातेवाईक पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी येऊ लागले. कौस्तुभ यांची छोटी बहीण काश्यपी पुढे आली. तिने पुष्पचक्र अर्पण करून बाजूला असलेल्या लष्कराच्या गार्डला काहीतरी विचारले. तिच्या हातात एक बॉक्स होता. गार्डची अनुमती मिळाल्यावर तिने शवपेटीवर आपल्या हातातील राखी आणि चॉकलेटचा बॉक्स ठेवला. ते पाहिल्यावर मात्र उपस्थितांना हुंदका फुटला. येत्या २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि त्यापूर्वी काही दिवस अगोदर काश्यपीचा आवडता दादा या जगातून निघून गेला. दरवर्षी आपल्या दादाच्या हातात बांधली जाणारी राखी काश्यपीला यावर्षी त्याच्या शवपेटीवर ठेवावी लागली. सोबत दादासाठी चॉकलेटचा गोड खाऊ. अंत्यसंस्काराची वेळ जवळ आल्यावर सैनिकांनी शवपेटीवरील राष्ट्रध्वज काढून त्याची घडी करून कौस्तुभ यांची पत्नी कणिका यांच्या हाती दिला.

- Advertisement -

त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करून त्यांनी तो छातीशी दोन्ही हातांनी घट्ट धरला. ते पाहताना उपस्थित नागरिकांच्या भावनांचा बांध फुटला. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. त्याचसोबत आकाशालाही आपले अश्रू अनावर झाले. पावसाची रिमझिम सुरू झाली. कणिका यांच्या एका हातात देशाचा अभिमान आणि पतीची आठवण असणारा राष्ट्रध्वज होता, तर दुसर्‍या हातात त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा अगस्त्य होता. या दोघांच्या मध्ये आपली हिंमत एकवटून एक वीरपत्नी म्हणून कणिका उभ्या होत्या. कौस्तुभ यांचे वय अवघे २९ वर्षे होते.

तरुण वयात मुलगा गेल्यामुळे कौस्तुभ यांचे वडील प्रकाश आणि आई ज्योती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सर्वसाधारणपणे मुलगा वडिलांना खांदा देतो आणि अग्नी देतो. पण आपल्या मुलाला खांदा आणि अग्नी द्यायची वेळ वडिलांवर येते ती त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड स्थिती असते. कौस्तुभचे वडील मनात प्रचंड दु:ख दाटलेले असताना या प्रसंगाला धैर्याने सामोरे गेले. पत्नी ज्योती यांना धीर दिला. कुटुंबप्रमुख या नात्याने सगळ्यांना सावरण्याची जबाबदारी त्यांच्या वृद्ध खांद्यावर आली होती. सैनिक हो तुमच्यासाठी…ए मेरे वतन के लोगो… ही गीते ऐकून आपण सगळे भारावून जातो. पण ज्यांचा मुलगा, पती, भाऊ जेव्हा लढताना शहीद होतो, तो येण्याऐवजी त्याचे पार्थिव जेव्हा घरी येेते, तेव्हा त्याचे आईवडील, पत्नी, बहीण यांच्या काय भावना असतील, हे समजण्यासाठी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, असेच म्हणावे लागेल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -