डुप्लिकेट मीटर बसवून, अख्खा मॉल चालवला चोरीच्या विजेवर

Mall owner

डुप्लिकेट मीटर लावून सर्रास वीजचोरी करणाऱ्या मॉल चालकाचा पर्दाफाश झाला आहे. प्रत्येकवेळी मीटर रिडिंग घेण्यासाठी येणाऱ्या मीटर रिडरची दिशाभूल करून वीजचोरीचा प्रकार गेले काही दिवस सुरू होता. महत्वाचे म्हणजे महावितरणच्या भरारी पथकाने दोनवेळा धाड टाकून या मॉलचालकाची वीजचोरी पकडली होती. पण भरारी पथकालाही न जुमानता दमदाटी करून या वीज ग्राहकाने आपला रेटा कायम ठेवला होता.

मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकाला मॉल चालक सुनील दवाणी व त्यांचा बंधू अनिल दवाणी यांनी ६ ऑक्टोबर रोजी शिवीगाळ व दमदाटी केली होती. तसेच संशयित मीटर दडवून ठेवत पोबारा केला होता. यासंदर्भात दवाणी बंधूंविरुद्ध सरकारी कामात अडथळा व अनुषंगिक कलमान्वये उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीच्या अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर भरारी पथकाने मॉलमध्ये असलेल्या दोन वीज जोडण्याच्या माध्यमातून वीजचोरी झाल्याचा अहवाल दिला. अहवालात मॉलमध्ये २१ हजार ५७ युनिट वीजचोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार चोरीच्या विजेचे ३ लाख ८२ हजार व ५० हजार दंडाच्या रकमेचा भरणा करण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात आली. कारवाईचा बडगा उगारताच दवाणी बंधूनी ४ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

संशयित मीटर दडवून महावितरणच्या भरारी पथकाला दमदाटी करणाऱ्या उल्हासनगर येथील सोनार गल्लीतील बी. के. स्मार्ट मॉलच्या चालकाने वीजचोरीचे बिल व दंडाच्या रकमेचा भरणा केला आहे. भरारी पथकाच्या अहवालानुसार कारवाईची नोटीस बजावताच मॉल चालकाने चोरून वापरलेल्या विजेच्या बिलासह दंडाची रक्कम महावितरणकडे जमा केली. विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे. तसेच वीजचोरीच्या गुन्ह्यात दंड व तीन वर्षांपर्यंत कारावास अशा कडक शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीजचोरीसारखा अपराध टाळण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.