पोलिसाची करामत! १४ वर्षांनी सापडलं चोरीला गेलेलं पाकिट! पण जुन्या नोटांनी केली पंचाईत!

stole a railway police wallet in thane borivali bus

तुमची एखादी वस्तू किंवा पाकिट चोरीला गेलं, तर तुम्ही त्याची रीतसर पोलीस तक्रार करता. पण त्यानंतर ती वस्तू किंवा पाकिट कधी मिळेल, याची कुणालाही शाश्वती नसते. ना तुम्हाला, ना तक्रार घेणाऱ्या पोलिसाना! रोज राज्यभरातल्याच काय, देशभरातल्याच काय, जगभरातल्या पोलिसांकडे अशा प्रकारे चोरीच्या हजारो तक्रारी दाखल होतात. पण त्यातल्या किती लोकांना आपल्या वस्तू परत मिळाल्या आहेत, हा एक प्रश्नच आहे. पण कधीकधी चमत्कार होतात. हो, चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळणं, हे कुठल्या चमत्काराहून कमी नाही. पण अशा वस्तू महिन्याभरात, दोन महिन्यात, सहा महिन्यात, फार तर फार वर्षभरात परत मिळाल्याच्या घटना ऐकिवात आहेत. पण मुंबईत एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीचं तब्बल १४ वर्षांपूर्वी चोरीला गेलेलं पाकिट शोधून काढलं आहे. आणि तेही त्यातल्या संपूर्ण रकमेसह! उगीच नाही मुंबई पोलिसांची (Mumbai Police) तुलना स्कॉटलंड पोलिसांशी करत!

तर झालं असं, की….

हेमंत पडळकर नावाच्या एका व्यक्तीने १४ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ मध्ये वाशी पोलिसांत एक तक्रार दाखल केली होती. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (CSMT) पनवेलकडे जाणाऱ्या लोकलने ते प्रवास करत असताना त्यांचं पाकिट कुणीतरी मारलं. मारलं म्हणजे चोरलं. त्याची त्यांनी तक्रार देखील केली. पण इतरांप्रमाणेच त्यांनीही ते आपल्याला परत मिळेल, याची आशा सोडून दिली होती. पुढच्या काही महिन्यांत नव्हे, वर्षात त्यांची आशा तशी खरीही ठरली. पण अचानक या वर्षी एप्रिल महिन्यात ऐन लॉकडाऊनच्या मध्यावर त्यांना वाशी जीआरपी अर्थात गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांकडून (GRP) फोन आला. त्यांचं पाकिट सापडलं होतं! अर्थात, त्यांना आश्चर्याचा धक्का बसला!

१४ वर्षांनंतर…

चोरीला गेलेलं पाकिट त्यातल्या पूर्ण ऐवजासह सापडल्यामुळे त्यांना आनंद तर झाला. पण लॉकडाऊन (Lockdown) सुरू असल्यामुळे जाणार कसं? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. शेवटी लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल झाल्यानंतर पडळकर वाशीच्या जीआरपी कार्यालयात दाखल झाले आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी पूर्ण रकमेसह त्यांचं पाकिट परत केलं. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाकिट चोरणाऱ्या भामट्याला अटक केली होती. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये पडळकरांचंही पाकिट होतं. (म्हणजे बघा, चोर देखील किती वर्ष चोरलेला मुद्देमाल जपून ठेऊ शकतात. पण त्यानं ते पाकिट तसंच का ठेवलं असेल, हाही एक प्रश्नच आहे!) पण पाकिट सापडलं, तरी पडळकरांसमोर एक नवाच प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या पाकिटात असलेल्या जुन्या नोटा आता तर बंद झाल्या आहेत. त्यांचं काय करायचं?

पडळकरांच्या पाकिटात…

सगळी मिळून रक्कम होती ९०० रुपये! त्यातही एक होती ५०० ची नोट. तीही जुनी! पण त्यांची पंचाईत जीआरपी पोलिसांनी दूर केली. पोलिसांनी त्यांना ३०० रुपये दिले आणि उरलेले ५०० रुपये ती जुनी नोट बदलून मिळाल्यानंतर देण्याचं आश्वासन दिलं. आता ते ५०० रुपये कधी मिळतील, याची उत्सुकता वजा आशा जरी पडळकरांना असली, तरी १४ वर्षांनंतरही आपली चोरीला गेलेली वस्तू परत मिळू शकते यावर मात्र त्यांचा आता विश्वास बसला आहे. तुमचं काही चोरीला गेलं आहे का?