रात्री डोअरबेल वाजवून पळणाऱ्या माथेफिरुला कांजूरमार्ग येथे अटक

Mumbai
arrest
प्रातिनिधीक फोटो

मुंबई पुर्व विभागातील कांजूरमार्ग येथे एक अजब घटना घडली आहे. एक माथेफिरू मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा लोक गाढ झोपलेले असतात, त्यावेळी दारावरची घंटी वाजवून पळून जायचा. कांजूरमार्ग येथील अनेक रहिवाश्यांना छळल्यानंतर या माथेफिरुच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम लालसिंह नेपाली (वय ३७) असे या आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत तो हे कृत्य करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री २ वाजता नेपालीने ओम श्री अक्षदिप को.ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणारे ज्वेलर्स राकेश मेहता यांच्या दारावरची घंटी वाजवून पळ काढला. मात्र त्यावेळी त्याला इतर रहिवासांनी पकडले. रहिवाश्यांनी १०० नंबर फिरवून पोलिसांनाही तात्काळ बोलावून घेतले. रहिवाश्यांनी नेपालीला पकडल्यानंतर तो रहिवाश्यांसोबत हाणामारी करत होता, मात्र रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नेपाळीला अटक केली आणि रहिवाश्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

राकेश मेहता यांनी पोलिसांमध्ये त्यानंतर रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर भादंवि कलम ४४८ (घरात अतिक्रमण), ५०४ (शांतताभंग करणे) आणि ५०६ (धाकदपटशा, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी) नुसारल गुन्हा दाखल केला. पोलिसांची चौकशी सुरु असताना सप्टेंबर २०१८ साली अशाचप्रकारची आणखी एक तक्रार नोंद झाल्याची माहिती मिळाली. मागच्या वेळेस फक्त समज देऊन नेपालीला सोडून देण्यात आले होते. मात्र यावेळी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी जाऊन चौकशी केली तेव्हा आणखी रहिवाश्यांनी पुढे येऊन तक्रार दिली. आमच्याही घराची अनेकदा बेल वाजवून कुणीतरी पळ काढत असल्याचे त्यांनी सांगितले. नेपाली हा चेंबूरला राहत असून त्याचठिकाणी तो एका हॉटेलमध्ये नोकरी करतो. मात्र नेपालीला धड हिंदीही बोलता येत नसल्याने चौकशी करण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here