घरमुंबईठाण्याचे खाडी किनारे सुशोभित करण्याच्या नावाखाली खारफूटीची कत्तल

ठाण्याचे खाडी किनारे सुशोभित करण्याच्या नावाखाली खारफूटीची कत्तल

Subscribe

ठाणे महापालिकेने खाडी किनारे सुशोभित करण्याचे काम हाती घेतले असून या स्मार्ट सिटीच्या नावाखाली खासगी कंत्राटदारांकडून खाडी किनारी असलेल्या खारफूटीची कत्तल केली जात असल्याचे समोर आले आहे.

ठाणे महापालिकेने खाडी किनारे सुशोभित करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या नावाखाली खासगी कंत्राटदारांकडून खाडी किनारी असलेल्या खारफूटीची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने बाळकूम येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा केला. अखेर महापालिकेने संबधित कंत्राटदाराला काम थांबिवण्याच्या सुचना केल्या आहेत. खाडी किनारी मातीचा भराव टाकून खाडी बुजवून खारफूटीची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘आपलं महानगर’ने उजेडात आणला होता. त्यामुळे ठाण्यात खारफूटीची कत्तल करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

- Advertisement -

खारफूटीची झाडे होत होती नष्ट

बाळकूम साकेत खाडीलगत असलेल्या तिवरांच्या झाडांची जेसीबीच्या साहाय्याने बेसुमार कत्तल करून, त्यावर मातीचा भराव टाकून तिवरांची झाडे नष्ट केली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेकडून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली होती. ठाण्यात खाडी किनारी विविध ठिकाणी खारफुटीची सर्रासपणे कत्तल केली जात असल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केलं होतं. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, बाळकूम येथील हे काम महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत सुरू असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

काम थांबिवण्याची कंत्राटदाराला पालिकेची सुचना

सदर जागेवर कांदळवन आणि कांदळवन लगत मातीची भरणी करून सपाटीकरण करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, हे काम बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काम करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे आदेश पारीत होईपर्यंत काम बंद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष जागेवर पंचनामा करण्यात आला. त्यावेळी मंडळ अधिकारी संजय पतंगे, तलाठी सोमन खाकर, ठामपाचे अभियंता सिध्देश राणे, सहा.बंदर निरीक्षक संदीप ठाकूर, पोलीस निरीक्षक सुधाकर डुंबे, कांदळवन समिती सदस्य राजीव दत्ता, बाळकूम ग्रामस्थ शेतकरी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक वाडेकर, राजन पाटील आदी उपस्थित होते. खारफुटीची कत्तल करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळकूम ग्रामस्थ संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे संबधितांवर महसूल विभागाकडून काय कारवाई होते याकडं लक्ष वेधले आहे.


हेही वाचा – महाशिवआघाडीची बैठक संपली, सत्तास्थापनेचा ‘ड्राफ्ट’ तयार!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -