रईस शेख यांनी निवडणुकीत मदत केली – मनोज कोटक यांचा गौप्यस्फोट!

समाजवाजी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला मदत केल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.

मनोज कोटक

‘मी फक्त भाजप-शिवसेना युतीचाच खासदार नसून काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचाही खासदार’, असल्याची स्पष्टोक्ती ईशान्य मुंबईतील भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी सोमवारी महापालिका सभागृहात दिली. एवढेच नाही, तर समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनीही आपल्याला मतदार संघात मदत केल्याची स्पष्ट कबुली कोटक यांनी दिली. ‘राधाकृष्ण विखे पाटलांसह प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेरकर, राजहंस सिंह असे विरोधी पक्षनेते युतीत आले असून महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा आणि सपाचे गटनेते रईस शेख यांनीही भाजपात यावे’, असे आवाहन करत कोटक यांनी त्यांना पक्ष प्रवेशाचे जाहीर निमंत्रण दिले आहे.

‘किमान शुभेच्छांच्या SMSला उत्तर द्या’!

मुंबई महापालिकेचे भाजप गटनेते मनोज कोटक हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमच महापालिका सभागृहात उपस्थित राहिले. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी त्यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी, ‘खासदार आणि आमदार बनलो तरीही महापालिकेतील कामकाजाची सर विधीमंडळात किंवा संसदेत अनुभवता येणार नाही’, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, ‘कोटक हे संसदेत गेले असले तरी त्यांनी महापालिकेला विसरु नये, त्यांची उणीव कायम आम्हाला जाणवेल’, असे सांगत ‘किमान शुभेच्छांच्या एसएमएसला त्यांनी उत्तर द्यावे’, असाही सूचक टोला मारला. सपाचे रईस शेख यांनी त्यांचे जुने अनुभव सांगत, ‘आपला मित्र खासदार झाल्याने आपण आनंदीत’, असल्याचे सांगितले.


हेही वाचा – माहुलवासीयांंच्या संतापामुळे मनोज कोटक यांचे पलायन

विरोधकांनी आमच्या पक्षात यावं’

यावर बोलतांना, आपण खासदार होणार याचे भविष्य यापूर्वीच शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी वर्तवल्याची आठवण सांगत ‘विकास आराखड्यावर भाषणामुळेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्या प्रेमात होते. तेव्हापासून ते माझ्याशी संपर्कात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास आणि आदित्यने दिलेली साथ यामुळेच आपण खासदार होऊ शकलो’, असेही त्यांनी सांगितले. ‘माझ्या विजयाचे श्रेय हे ईशान्य मुंबईतील युतीच्या २७ नगरसेवकांचे आहे, असे सांगत त्यांनी एम पूर्व विभागात सपाचे गटनेते रईस शेख यांची मदत मिळाल्याची कबुलीही दिली. तसेच, ‘ज्यांना माझ्या नसण्याची उणीव भासणार आहे, त्यांनाच मी पक्षात घेऊन जातो’, असे सांगत ‘महापालिकेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आमच्या पक्षात यावे’, असेही आवाहन त्यांनी केले.