मराठी नाट्य कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंकडे धाव

मराठी नाट्य कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले कित्येक तरूण बेरोजगार झाले. दरम्यान, कोरोनामुळे आर्थिक संकट अनेकांवर ओढावले असतांना काही संघटनेच्या प्रमुखांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. त्याचप्रमाणे मंगळवारी जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरे यांच्या समोर मांडल्या.

या शिष्टमंडळातील प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे हजर होते. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींनी तोंड द्यावे लागले. त्यामुळे या कलाकारांनी देखील आज राज ठाकरेंची भेट घेतली.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत मुंबईसह राज्य पुन्हा पूर्वपदावर येत असताना काही दिवसांपूर्वीच सरकारने नाट्यगृह, सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी मिळाली आहे. नाट्यगृह, सिनेमागृह यांच्या एकूण आसन क्षमनतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. मात्र असे असले तरी मराठी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान नाट्यगृह सुरु होत असली तरीही त्यांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. आपल्या याच अडचणी मराठी कलाकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढे मांडल्या.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर कोळी भगिनींची सुटली समस्या

परप्रातींय मासे विक्री करत असल्याने स्थानिक कोळी लोकांना याचा त्रास होत होता. यावेळी “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी तक्रार घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत कोळी भगिनींनी मदत मागितली होती. त्यानंतर २४ तासांच्या आत त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला व कोळी भगिनींची समस्या सोडवली अशी माहिती मनसे अधिकृत या टि्वटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.