‘चला, एकत्र येऊ या’ मेळाव्याला ज्येष्ठ लेखिका नयनतारांची उपस्थिती

मराठी साहित्य, कलाविश्वातील लेखक-कलावंत आणि रसिक यांनी एकत्र येऊन ‘चला एकत्र येऊ या!’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल उपस्थित राहणार आहेत.

Mumbai
nayantara sehgal
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना दिले गेले होते. मात्र संमेलनाच्या आयोजकांनी ते निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल येऊ शकल्या नाहीत. परंतु ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल येत्या २९ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या त्यांच्या अवमानाबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी साहित्य आणि कलाप्रेमी रसिकांनी एका मेळाव्याचे आयोजने केलं आहे. या मेळाव्याला त्या उपस्थित राहणार असून त्या काय बोलणार याबद्दल उत्सुकता आहे.

हा आहे मेळाव्याचा हेतू

अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुनरुच्चार व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा हक्क अबाधिक राखणं, हा या मेळाव्याचा हेतू आहे. हा मेळावा दादर येथील शिवाजी मंदिरात रविवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

साहित्य आणि कलाप्रेमी मराठी भाषिकांचा मेळावा

हा कार्यक्रम म्हणजे सर्व साहित्य आणि कलाप्रेमी मराठी भाषिकांचा मेळावा आहे. त्याच्या आयोजनामागे कोणीही राजकीय व्यक्ती, पक्ष वा संघटना नाही. या कार्यक्रमाला कोणी उद्घाटक किंवा प्रमुख अतिथी असणार नाहीत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा असलेला साहित्य आणि कला प्रेमी मराठी भाषिकांचा हा उत्स्फूर्त मेळावा आहे. या कार्यक्रमास सन्माननीय नयनतारा सहगल यांच्या बरोबर भालचंद्र नेमाडे, पुष्पा भावे, डॉ गणेश देवी, हरिश्चन्द्र थोरात, अरुण खोपकर, सुनील शानभाग, चंद्रकांत कुलकर्णी, राजीव नाईक, येशू पाटील, टी.एम. कृष्णा, सिद्धार्थ वरदराजन, प्रज्ञा दया पवार, जयंत पवार, ज्ञानेश महाराव, संध्या नरे पवार, समीना दलवाई, अनंत भावे, अमोल पालेकर, अतुल पेठे, किशोर कदम, इंद्रजीत खांबे, डॉ विवेक कोरडे, गणेश विसपुते, संजीव खांडेकर, सुबोध मोरे, आशुतोष शिर्के, अविनाश कदम, इत्यादी मान्यवर लेखक, कवी, कलावंत, विचारवंत उपस्थित असतील. हा कार्यक्रम मराठी साहित्याच्या वाचकांसाठी खुला असणार आहे. सगळे मिळून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुनरुच्चार करू या; चला, एकत्र येऊ या, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येणार आहे.


वाचा – नयनतारा सहगल प्रकरणावरून गडकरींचा सरकारला घरचा आहेर

वाचा – नयनतारा सहगल प्रकरण : साहित्यिकांचा निमंत्रण वापसीचा सूर