घरमुंबईईशान्य मुंबई लोकसभा: ज्याच्या झोळीत मराठी टक्का त्याचा विजय पक्का

ईशान्य मुंबई लोकसभा: ज्याच्या झोळीत मराठी टक्का त्याचा विजय पक्का

Subscribe

भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांना उमेदवारी देण्याला शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे चर्चेत आलेला ईशान्य मुंबई मतदार संघ त्यानंतर भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार सभेत उडवण्यात आलेला ड्रोन, कार्यालयातील वाद व शिवसेनेचा कोटक यांना विरोध कायम असल्याच्या अफवा अशा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. याचा कमी अधिक प्रमाणात कोटक यांना प्रसिद्धी झोतात राहण्यास मदत झाली. त्याचबरोबर कोटक यांनी बाईक रॅली, रोड शो, सभा, बैठका घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजित पध्दतीने प्रचार करत आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. संजय पाटील यांच्यासह त्यांची पत्नी पल्लवी पाटील व दोन मुली ही प्रचारात उतरल्या आहेत. पल्लवी पाटील या त्यांच्या मम्मीज बचत गटाच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत आहेत. तसेच कार्यकर्त्यांसोबत विविध भागात प्रचार करत आहेत.

- Advertisement -

शिवसेनेच्या विरोधामुळे कोटक यांना ही निवडणूक फार अवघड असल्याचे बोलले जात होते. मात्र कोटक यांनी स्थानिक शिवसेना नगरसेवकांच्या घरी थेट स्नेहभोजनाला जाऊन त्यांच्या मनातील किल्मिष दूर केले. त्यामुळे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोटक यांच्या प्रचार जोमाने करू लागल्याने कोटक यांना विजयाची आशा दिसू लागली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरल्याने विक्रोळी, भांडुप, नाहुर, या मराठी बहुल भागामध्ये कोटक यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. महत्त्वाच्या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या निहारिका खोंदले यांनी बाईकरली, प्रचार सभा या माध्यमातून आपल्या अस्तित्त्वाची दखल घेण्यास भाग पाडले आहे.

मुंबईतील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राज्यातील अनेक मातब्बर नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे येत्या चार दिवसांत मुंबईत मोठ्या प्रमाणात जाहीर सभा, रॅली होणार आहेत. यामध्ये ईशान्य मुंबईत 23 एप्रिलला गोवंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली तर विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. या दोन्ही सभांचे वैशिष्ठ्य म्हणजे गोवंडी, मानखुर्द या परिसरात संजय पाटील यांचा खास प्रभाव आहे. त्यामुळे येथे घेतलेल्या सभेचा परिणाम नक्कीच पाटील यांच्या मतांमध्ये वाढ करण्यास मदत करेल. त्याच प्रमाणे विक्रोळीतील कन्नमवार नगर, घाटकोपरमधील रमाबाई नगर, भांडुपमध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता वास्तव्यास आहे.

- Advertisement -

यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे. तसेच विकोळी व घाटकोपर पश्चिमेला मुस्लीम समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ही गोष्ट लक्षात घेत वंचित बहुजन आघाडीने विक्रोळीत घेतलेली सभा म्हणजे युती व आघाडीसाठी एक प्रकारे धोक्याची घंटा समजली जात आहे. त्याचप्रमाणे 24 एप्रिलला भजपचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपरमध्ये भाजपची मोठी सभा घेण्यात येणार आहे. या तिन्ही सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होणार असल्याने त्याचा बराच फायदा तिन्ही उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.

उत्तर पूर्व मुंबईत मराठी मत युती आणि आघाडीच्या उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. एकूण मतदारांच्या ४६ टक्के हे मराठी मतदार आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनीही या मतदारांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार मराठी माणूस म्हणून केला जातोय . परंतु आपण मराठी पुरता मर्यादित न राहता सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करतोय असे हे दोन्ही उमेदवार आवर्जून सांगत आहेत

आकडेवारी

मराठी – ७,१,३१३
उत्तर भारतीय – १,५१,६७३
मुस्लीम – २,३५,८१७
ख्रिश्चन – २७,५५१
गुजराती- १,८१,४१६
अन्य – १,९९,७४४
एकूण – १५,२७,५१४

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -