पहिल्याच पावसात नालेसफाईचे पितळ उघड; चिखलफेक आंदोलनाचा इशारा

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याविरोधात सेना पदाधिकाऱ्याने पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Kalyan
Kalyan Dombivli Municipal Corporation
कल्‍याण-डोंबिवली महापालिका

कल्याण शहरात पडलेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईच्या कामांचे पितळ उघड पडलं आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ गुरूवार २७ जून रोजी महापालिकेवर मोर्चा काढून चिखलफेक आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी सभागृहनेता आणि कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिला आहे. केडीएमसीत शिवसेनेची सत्ता असतानाही सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा दिल्याने सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर मिळाला आहे.

नालेसफाईबाबत प्रशासन गंभीर नाही

महापालिकेने साडेतीन कोटी रूपये खर्च करून नालेसफाईची खासगी कंत्राटं दिली आहेत. मात्र कंत्राटदाराकडून नालेसफाईची कामे व्यवस्थितपणे झालेली नाहीत. १० जून रोजी पडलेल्या पहिल्याच पावसात कल्याणा शहरातील गटारे व नाले पूर्णपणे भरून रस्त्यावरून वाहत होते. तसेच सर्वत्र चिखल आणि गाळ जमा होऊन कल्याण शहर चिखलमय झालं होतं. महापालिकेच्या नाले व गटार सफाईचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे पहिल्याच पावसात सिध्द झाल्याचे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे. नालेसफाईची कामे व्यवस्थितपणे होत नसल्याबाबत यापूर्वीही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कंत्राटदाराकडून गटार व नालेसफाई व्यवस्थित साफ करून घेण्यात कुचराई करणाऱ्या व कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे, अशीही मागणी मोरे यांनी केली आहे. कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून मोर्चासह सुरूवात होणार असून हा मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकणार आहे.

नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला महापौरांना मुहूर्त कधी ?

नालेसफाईची कामे निष्कृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असतानाही महापौर विनिता राणे यांच्याकडून अजूनही नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली की नाही यासाठी महापौर हे पालिका, अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी करतात. परंतू यंदा नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला अजूनही महापौरांना मुहूर्त मिळालेला नाही. नालेसफाईची कंत्राटं ही सेनेच्या पालिकेतील एका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळते. त्यामुळेच नालेसफाईच्या कामांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत का ? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here