Covid च्या सुट्टीसंदर्भातील पालिकेच्या नव्या धोरणाचा मार्डकडून निषेध

नॉन-कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता पालिकेच्या हॉस्पिटलमधील कोरोना ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांचा विश्रांती कालावधी एक दिवसांचा करण्यात आला. यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच पालिकेकडून जारी करण्यात असून, त्याची अंमलबजावणी १० सप्टेंबरपासून करण्यात आली असून, पालिकेच्या या निर्णयाविरोधात सायन मार्डकडून शुक्रवारपासून सात दिवस निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोनामध्ये डॉक्टरांना सात ते १५ दिवस काम केल्यावर सात दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र आता नॉन-कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा विश्रांती कालावधी कमी केला आहे. नव्या परिपत्रकानुसार कोरोना ड्युटीवर काम केल्यानंतर डॉक्टरांना एक दिवसांची विश्रांती व त्यानंतर नॉन-कोविडच्या ड्युटीवर डॉक्टरांना रूजू होण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. परंतु कोविडच्या ड्युटीवर काम करताना डॉक्टरांना अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा कालावधी कमी करण्यात येऊ नये यासाठी सायन हॉस्पिटलमधील मार्डने सात दिवस आंदोलन पुकारले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी हॉस्पिटलमधील ओपीडी, वॉर्ड आणि शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर डाव्या हाताला काळी फित बांधून निषेध करणार आहेत. तर दुसर्‍या दिवशी नैराश्यासाठी निळी फित, चिंतेसाठी हिरवी फित, रागासाठी लाल फित, सचोटीसाठी गडद निळा, आशवाद यासाठी पिवळी आणि शेवटच्या दिवशी सफेद रंगाची फित लावण्यात येणार असल्याचे सायन हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले.