मी काय स्पायडरमॅन आहे का? उर्मट उत्तर पोलिसाला पडले महागात

Mumbai
tripple seat mumbai police
प्रातिनिधिक छायाचित्र

पोलीस म्हटलं की आपल्यासमोर उभी राहते उर्मटपणे बोलणाऱ्या व्यक्तीची छबी. काही अपवाद वगळता सामान्य माणसांना पोलीस हे उर्मटच वाटत असतात. मात्र पोलिसांचे हे उर्मट वागणे सामान्य माणूस गपगुमान सहन करतो कारण तो सामान्यच असतो. मात्र एखादा न्यायाधीश पोलिसांची उर्मट उत्तरे का ऐकून घेईल? न्यायदान करणाऱ्या व्यक्तीसमोरच जर पोलीस कायदा पाळत नसतील तर न्यायाधीश काय करु शकतो, याचे मुर्तिमंत उदाहरण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथे घडले आहे. न्यायाधीशाला उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

असा घडला प्रसंग

मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक विलास गंगावणे असे बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. गंगावणे हे अनेकदा विविध प्रकरणात चर्चेत राहिलेले आहेत. आता या नवीन प्रकरणामुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आले आहे. मागच्या आठवड्यात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी मरीन ड्राइव्ह परिसरात नाकाबंदी लावली होती. विलास गंगावणे स्वतः जातीने या बंदोबस्तासाठी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे मरीन ड्राईव्हवर मॉर्निग वॉक करणाऱ्यांची वर्दळ होती. यावेळी तिथून एक बाईक गेली ज्यावर तिघेजन प्रवास करत होते. मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका न्यायाधीशांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी विलास गंगावणे यांना याबद्दल जाब विचारला. ट्रिपल सिट जाणाऱ्या बाईकस्वारांना का नाही पकडले? असा प्रश्न न्यायाधीशांनी गंगावणे यांना विचारला. मात्र बाईक पुढे गेल्यामुळे गंगावणे म्हणाले की,

‘मी काय स्पायडरमॅन आहे काय त्यांना पकडायला’. या उत्तरावर न्यायाधीशांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन करुन आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तानी विलास गंगावणे यांची एसबी २ येथे बदली केली असल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here