घरमुंबईफेरीवाले आणि मॉल्सकडून पालिकेच्या मंडयांची गळचेपी

फेरीवाले आणि मॉल्सकडून पालिकेच्या मंडयांची गळचेपी

Subscribe

 गाळेधारक उपाशी, फेरीवाले तुपाशी ,मंडया दुरुस्ती आणि पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत

मुंबईकरांना भाजीपाला खरेदीसाठी महापालिकेने ठिकठिकाणी मंडयांची व्यवस्था केली. परंतु वाढते फेरीवाले आणि मॉल्स यामुळे मंडयांची दुरवस्था झाली आहे. मंडयामध्ये आज कोणीच फिरकेनासे झाले आहे. महापालिकेच्या मंडया ग्राहकांअभावी ओस पडू लागल्या आहेत. महापालिकेला भाडे भरूनही मंडयामध्ये कोणत्याही सोईसुविधा नाहीत. त्याउलट फेरीवाले महापालिकेला एकही पैसा न देता मंडयांच्या दारात बसून धंदा करत बक्कळ पैसा कमवत आहेत. मंडयांमधील गाळेधारक एकेका ग्राहकाच्या प्रतिक्षेत दिवसाच्या कमाईची जमवाजमव करतात. वाढत्या फेरीवाल्यांमुळे मंडयांमधील गाळेधारकांना होणार्‍या त्रासाकडे महापालिकेचे लक्ष तर नाहीच, पण मंडयांचा विकासही करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक मंडई आज दुरुस्ती आणि पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असून महापालिकेकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.

भाजी मंडईत इतर वस्तूंचाच बाजार, कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेने लाखो रूपये खर्च करून भाजी मंडया बांधल्या आहेत. मात्र अनेक भाजी मंडईची दुरवस्था झाली आहे. कल्याणच्या भाजी मंडईत चक्क इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजार भरतोय. कल्याणमधील सावतामाळी भाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे मनसे, शिवसेना आणि भाजपमधील राजकीय पक्षाच्या मंडळींनी लाटले आहेत. महापालिकेने बांधलेल्या भाजी मंडया अनेक वर्षापासून असुविधांच्या गर्तेत सापडल्या आहेत. अनेक मंडयांतील ओट्यांना वापराविना थडग्याचे स्वरूप आले आहे. त्यातच सुरक्षा वार्‍यावर असल्याने मंडयांमध्ये अनैतिक प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. इलेक्ट्रिक वस्तूंची दुकाने, रूग्णालये, बँक व हॉल यासाठी मंडईमधील गाळे भाड्याने दिले आहेत. यातून महापालिकेला लाखोंचे उत्पन्न मिळते. भाडेतत्वावर मंडयांचे ओटे दिल्याने भाजीपाला आणि फळविक्रीचा मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील भाजी मंडया केवळ शोभेपुरत्याच असल्याने पालिकेचे लाखो रुपये वाया जात आहेत.

- Advertisement -

फेरीवाल्यांचा विळखा (कै. लक्ष्मणराव यादव मंडई, कुर्ला)
मुंबई उपनगरातील मंडईपैकी कुर्ला एल विभागातील ‘कै. लक्ष्मणराव यादव मंडई’ रेल्वेस्थानकापासून २०० मीटर अंतरावर आहे. या मंडईत शाकाहारी आणि मांसाहारी मिळून ३५० गाळे आहेत. मंडईच्या विकासासाठी ‘कै. लक्ष्मणराव यादव मंडई’ सेवा संघाने पुढाकार घेऊन मंडईच्या विकासासाठी २००० मध्ये प्रस्ताव बनवला. मात्र खासगी विकासकांकडून मंडईचा विकास करण्यात येणार आहे. मंडईत कुर्ला पूर्व पश्चिम, काजूपाडा, साकीनाका, जरीमरी, कलिना, वाकोला येथून नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र सुविधा नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मंडईच्या बाहेर मोठ्या प्रमाणात असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. ग्राहक मंडईमध्ये येण्याऐवजी फेरीवाल्यांकडून भाजी खरेदी करत असल्याने मंडईतील विक्रेते हैराण झाले आहेत. बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेच्या अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक समस्यांने ग्रासलेल्या या मंडई काही वर्षांपूर्वी महापालिकेकडून डागडुजी करण्यात आली, मात्र डागडुजी व्यवस्थित न झाल्याने तेथील समस्या कायम आहेत, असे ‘कै. लक्ष्मणराव यादव मंडई’ सेवा संघाचे पदाधिकारी तसेच व्यापारी अजय यादव यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

मंडईत घाणीचे साम्राज्य (सावरकर मंडई, दादर)
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे स्वांतत्र्यवीर सावरकर मंडई आहे. मंडईत 40 ते 50 विक्रेते आहेत. मंडईमधील खराब झालेला भाजीपाला हा मंडईच्या दारात पडलेला असतो, त्यामुळे परिसरातदेखील घाणीचे साम्राज्य असते. मंडईतल्या भाजी विक्रेत्यांनी पालिकेला भाडे देऊनही पालिकेतर्फे त्यांच्यासाठी पुरेशी सोईसुविधा नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या मंडईत प्रचंड गर्दी असते. मंडईवर निवारा म्हणून टाकलेले पत्र्यांमधून पावसाळ्यात पाणी गळते. प्रत्येकी विक्रेत्याकडून 12 ते 15 हजाराचे भाडे पालिका आकारात असते त्यामुळे या जागेसाठी मूलभूत आणि चांगल्या सोयी मिळाव्यात असे इथल्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मंडई नव्हे गोदाम, घाटकोपर
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील पालिकेची ही मंडई एकेकाळी गजबजलेली असायची, परंतु पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षेमुळे तिची अवस्था दयनीय झाली आहे. मंडईमध्ये दिवे आणि पंख्याची सोय नसल्याने तसेच ही मंडई बंदिस्त असल्याने आतमध्ये पूर्णत: अंधार असतो. मंडईतील 44 गाळ्यांपैकी फक्त 17 गाळ्यांमध्ये भाजी विक्री होत आहे. तर अन्य विक्रेत्यांनी ग्राहक फिरकत नसल्याने त्रस्त होऊन व्यवसाय केला आहे. मंडईच्या बाहेर बसणारे फेरीवाले हटवण्यात आल्याने मंडईजवळून जाणार्‍या नागरिकांची संख्या कमी झाली याचा फटकाही मंडईतील व्यवसायावर झाला आहे. घाटकोपर पूर्वेला पंतनगर येथे असलेली अन्य पालिकेच्या मंडईचे काही वर्षांपूर्वी पुनर्विकास करण्यात आला होता. परंतु येथील गाळेधारकांना इमारतीच्या बेसमेट (तळघर) मध्ये जागा दिल्याने ग्राहकांना उतरताना त्रास होतो. त्यामुळे मंडईत जाणार्‍या ग्राहाकांची संख्या घटली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील मंडई, दादर
दादर पुलाखाली मोठ्या प्रमाणात बसणार्‍या बेकायदा भाजीवाल्यांमुळे दादरमधील क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील भाजीवाल्यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. या भाजीवाल्यांना हटवल्यास आमचा चांगला धंदा होईल, असे मत अनेक गाळेधारकांनी व्यक्त केले. पालिकेकडून मंडईची साफसफाई करण्यात येत असली तरी ती समाधानकारक नसल्याचे गाळेधारकांनी सांगितले.

मीनाताई ठाकरे मंडई
मीनाताई ठाकरे ही फुलांची मंडई २३ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. फक्त फुलांची मंडई असल्याकारणाने या मंडईत येणार्‍या ग्राहकांना फारसा त्रास होत नाही. या मंडईत ६३४ दुकाने आहेत. पार्किंग जागा कमी असल्याने आणि बाजूलाच फिश मार्केट असल्याकारणाने माशांचं पाणी फुलांमध्ये पडतं, असं संचालक पदावर काम करणार्‍या अविराज पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे, सणानिमित्त कामगार स्टेडियम बुक करावे लागते. ज्यामुळे मुंबईत ट्रॅफिकची गैरसोय होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो.

विकासकांद्वारे पुनर्विकास करण्यात येणार्‍या मंडया : १८
पुनर्विकासासाठी विकासकांकडून आलेले प्रस्ताव : १२
पालिकेच्यावतीने होणारा पुनर्विकास : १४
मंडयांची सर्वांगिण दुरुस्ती : ६
नव्याने बांधण्यात येणार्‍या मंडया : ५

पुनर्विकास झालेल्या मंडया
संत जलाराम बाप्पा मंडई, वाकोला मंडई, घाटकोपर पंतनगर मंडई, वाकोला मंडई

विकासकांमार्फत पुनर्विकास होणार्‍या मंडया
कलिना मंडई, पाली हिल मंडई, टिळक नगर मंडई, हिराचंद देसाई मंडई, विक्रोळी पार्कसाईट मंडई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडई, संत गाडगे महाराज मंडई, घमाजी मनाजी घाऊक केळा मंडई, जी. एल. पाटील मंडई, हेमंत मांजरेकर मंडई.

पुनर्विकासाला मान्यता दिलेल्या मंडया
सांताक्रुझ मंडई, अण्णासाहेब वर्तक मंडई, आचार्य आत्माराम भाऊ लाड मंडई, समर्थ रामदास मंडई, व्ही. एल. वाघधरे मंडई.

रद्द केलेले पुनर्विकास प्रस्ताव
गोपी टँक मंडई, खेरवाई मंडई, चेंबूरकर मंडई, मुलुंड पूर्व मंडई, दीनानाथ मंगेशकर मंडई, वीर संभाजी मंडई, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, अंधेरी मंडई, डोंगरी मंडई, भुलेश्वर मंडई, जेव्हीपीडी मंडई

पालिकेच्यावतीने पुनर्विकास करण्यात येणार्‍या मंडया
महात्मा फुले मंडई फेज दोन, टोपीवाला मंडई, वांद्रे टाऊन मंडई, शिरोडकर मंडई, बाबू गेनू मंडई, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सोमवार बाजार मंडई, टागोर नगर मंडई, लक्ष्मण मामा मोरे मंडई, बोरीवली मंडई, अँटॉप हिल मंडई, चेंबूरकर मंडई,संत सावता मंडई, नवलकर मंडई

दुरुस्ती करण्यात येणार्‍या मंडया
मिर्झा गालिब मंडई, लोकमान्य टिळक मंडई, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, क्रांतीसिंह नाना पाटील मंडई, गोपी टँक मंडई

नव्याने बांधण्यात येणार्‍या मंडया
चांदिवली मंडई, बोर्लादेवी मंडई, वझीरा मंडई, भांडुप अ‍ॅमेनिटी प्लॉट, माहुल मंडई

माहिमच्या गोपी टँक मार्केटचा पुनर्विकास रद्द
माहिम येथील गोपी टँक मार्केटच्या पुनर्विकासाला देण्यात आलेली मान्यता आता रद्द करण्यात आली आहे. सन २००९ मध्ये गोपी टँक मार्केटच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली होती. विकासकाकडून पुनर्विकासासाठी कोणतीही हालचाली न झाल्यामुळे मान्यता रद्द करून याची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मेसर्स ओंकार रिअटल्स डेव्हलपर्स यांची विकासक आणि दाभोळकर अ‍ॅण्ड दाभोळकर यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली होती. पुनर्विकासासाठी मंडई ताब्यात असताना विकासकाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मार्केट मोडकळीस आले होते. त्यामुळे सन २०११-१२ मध्ये गोपी टँक मार्केटसाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्यानंतरही यावर किरकोळ खर्च करण्यात आला होता.

मुलुंडची चाफेकर मंडईची जागा पोस्ट ऑफिसला
मुंबईतील अनेक प्रकल्पामध्ये बाधित होणार्‍या दुकानदारांसह व्यावसायिक गाळेधारकांचे पुनर्वसन हे मंडईंच्या जागेत करण्यात येते. पण सध्या प्रकल्पबधितांच्या पुनर्वसनासाठी गाळे कमी पडत आहेत. परिणामी विकास कामांच्या प्रकल्पाची कामे रखडली जात आहे. परंतु दुसरीकडे प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या मंडईच्या जागाच भाड्याने देण्याचा घाट घातला जात आहे. मुलुंडमधील चाफेकर मंडईतील सुमारे १२०० चौ. फुटांची जागा पोस्ट कार्यालयासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिरोडकर मंडईचा पुनर्विकास
एफ दक्षिण विभागातील जगन्नाथ भातनकर मार्ग येथील महापालिका घाऊक मंडई व कर्मचारी निवासस्थान असलेल्या शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. १०१ कोटी रुपये खर्च करून शिरोडकर मंडईचा विकास केला जाणार आहे. तळ अधिक एकवीस मजली इमारतीमध्ये तळघर व तळ मजला हा मंडईसाठी तर पहिला ते तिसरा मजला गोदाम तसेच चौथा ते सातवा मजला वाहनतळ आणि आठवा ते ऐकवीस मजल्यापर्यंत कर्मचारी निवासस्थान असणार आहे.

बाबू गेनू मंडईचा विकास
डॉकयार्ड येथील बाबू गेनू महापालिका मंडईची 10 वर्षांपूर्वी इमारत कोसळून सुमारे ६८जणांचे जीव गेले होते. त्यानंतर 10 वर्षांनी इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. यामध्ये मंडईसह शालेय इमारत बांधली जाणार आहे. तळ अधिक सहा मजल्याची ही इमारत असेल. तळघर, तळमजला अधिक एक पाच मजली आणि एक सहा मजली अशा दोन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. सुमारे ३८ कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. याला स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे.

पालिकेच्या मंडयांमध्ये चांगला व ताजी भाजी मिळते. तसेच रस्त्यावर मिळणारी भाजी ही रेल्वे रुळालगतच्या गटारातील पाण्यावर पिकवलेली असते. मात्र पालिकेच्या मंड्यांमधील भाजी चांगली असते. मंडयांमध्ये फिरल्यावर विविध प्रकारची आणि किमतीच्या भाज्या मिळतात. तसेच काटा मारण्यात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत नाही. त्यामुळे पालिकेच्या मंडया टिकल्या पाहिजेत. पुनर्विकासाच्या नावाखाली त्या बिल्डरांच्या घशात घालू नका.
– अनुपमा, ग्राहक

प्रत्येकी 10 हजार भाडे आम्ही देतो. पण इथे नीट स्वच्छताही केली जात नाही. पत्रेही खूप जीर्ण झालेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे काम व्यवस्थित झाल्यास मंडई चांगली दिसेल.
– मनोज आंधणे, टोमॅटो विक्रेता, सावरकर मंडई

दोन वर्षांपूर्वी गोपी टँक मंडईची दुरुस्ती झाली, आता पन्हाळ्याचे काम सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे, पण अद्याप काम सुरू झालेले नाही. जी कामे पूर्ण झाली आहेत ती योग्य प्रकारे झालेली नाहीत. दुरुस्तीची कामे करताना गाळेधारकांना काय हवे याचा विचार न करताच दुरुस्तीचे काम परस्पर ठरवून केले जाते. त्यामुळे मंडईतील दुरुस्तीचा लाभ होत नाही.
– मनिष ठाकूर, गाळेधारक, गोपीटँक मंडई माहिम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -