घरमुंबईमस्जिद बंदर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुल उद्या पाडणार

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुल उद्या पाडणार

Subscribe

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाला पाडण्यासाठी आणि पुनर्निर्माणाच्या कामासाठी ४५ दिवस लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रात्रीही काम करण्यात येईल.

मध्य रेल्वेने मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावरुन लाखोच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे हा पादचारी पुल तोडून नवीन पादचारी पुल उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या पुलाला पाडण्यासाठी रेल्वेने सर्वेक्षण केले होते. या पुलाला तोडण्याचे कामाला २६ नोव्हेंबर म्हणजे सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी नवा पादचारी पुल बांधण्यात येणार आहे. पुल तोडण्याचे काम ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच २ आणि १२ डिसेंबर रोजी मशीद बंदर स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पाच तासाचा विशेष मेगाब्लॉक

पुलाच्या कामासाठी २ डिसेंबर म्हणजे रविवार आणि १२ डिसेंबर म्हणजे बुधवारी मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक नेमका कोणत्या वेळेत घेण्यात येणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र ज्या वेळेमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्या दरम्यान लोकल गाड्या फक्त भायखळ्यापर्यंतच चालवण्यात येतील. त्यामुळे या मार्गावरील धिमी वाहतूक सीएसएमटी ते भायखळा या स्थानका दरम्यान बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत जलद मार्गावरून विशेष जलद सेवा उपलब्ध असेल.

- Advertisement -

पुलाच्या कामाला ४५ दिवस लागणार

२२ नोव्हेंबरला या पादचारी पुलाचे निरिक्षण करण्यात आले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने या पुलाला पाडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने सांगितले या पादचारी पुलाला पाडण्यासाठी आणि पुनर्निर्माणाच्या कामासाठी ४५ दिवस लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रात्रीही काम करण्यात येईल. तसंच २६ नोव्हेंबरला मध्यरात्री दोन ते तीन तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरु करणार

पादचारी पुलावरील आरक्षण केंद्र या कालावधीत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण दिशेकडील आरक्षण कार्यालयात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू राहतील. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून टीसी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात येणार आहे. या पुलाशिवाय आणखी दोन पादचारी पूल सध्या स्थानक परिसरात आहेत. त्यामुळे प्रवाशांना फारसा त्रास होणार नाही, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -