माथेरानच्या पायवाटा, घोडेगाडी वाहतुक सुधारणार

पायवाटांसाठी एमएमआरडीएकडून क्ले बॉक्सचा वापर

matheran points

माथेरानच्या पर्यटन क्षेत्रात पायवाटा आणि घोड्यांच्या वाटांची गेल्या काही वर्षांमध्ये दुर्दशा झाली आहे. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊनच याठिकाणी पायवाटा आणि घोड्यांच्या वाटा यामध्ये सुधारणा करण्याचे काम मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे माथेरानच्या विविध पॉईंटच्या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम येत्या दिवसात पर्यटकांना अनुभवायला मिळणार हे नक्की.

foothpath

एमएमआरडीए चे महानगर आयुक्त आर ए राजीव नुकतीच माथेरानला भेट दिली.माथेरान गिरीस्थान येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या प्रगतीचा हा एक धावता आढावा आहे. माथेरान मॉनिटरिंग कमिटी ( एम् एम् सी ) यांच्या मान्यते प्रमाणे एम एम आर डी ए ने माथेरान गिरीस्थान येथे काही कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये पॅनोरामा पॉइंट, हार्ट पॉइंट, मिर्या पॉइंट, एको पॉईंट यासारख्या ठिकाणांवर सुधारणा आणि सुशोभीकरण करणे. तसेच दस्तुरी माथेरान येथील पायवाटेमध्ये सुधारणा आणि सुशोभीकरण करणे अशा कामांचा समावेश आहे.

सद्यस्थितीमध्ये दस्तुरी नाक्यापासून पुढे जाणाऱ्या पायवाटा ओबडधोबड आणि दगड मातीने व्यापलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची नियमित देखभाल करतेवेळी माती धुरळा उडून खूप त्रास जाणवत आहे.यावर मात करण्यासाठी एमएमआरडीएने या ठिकाणी सध्याच्या पायवाटेमध्ये काही सुधारणा करून त्यावर अधिक सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. या पायवाटांवर आता लॅटेरेक्टिक क्ले ब्लॉक्स् बसविले जाणार आहेत. अशा प्रकारच्या लॅटेरेक्टिक क्ले ब्लॉक्स बनविण्यासाठी भारतीय मानकांमध्ये किंवा युरोपियन मानकांमध्येही काही मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नाहीत. या कामासाठी आवश्यक असलेल्या ब्लॉक्सची संख्या प्रचंड मोठी आहे. तसेच या पायवाटांवर घोडे आणि घोडागाडया यांच्या वाहतुकीचा भारही खूपच मोठा आहे. त्यामुळे क्ले ब्लॉक्सच्या निर्मितीसाठी सखोल संशोधन आणि विकास प्रक्रियेची आवश्यकता होती.

चिपळुण येथील एका प्रयोगशाळेमध्ये तसेच कारखान्यामध्ये या विषयावर सखोल संशोधन पूर्ण झाल्यानंतरच एम एम आर डी ए ने अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक क्ले ब्लॉक्सच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणारे घटक आणि निर्मितीची प्रक्रिया या मधील सर्व तपशील निश्चित केले. याप्रमाणे प्रयोग केल्यानंतर ते उत्पादन आयआयटी मुंबई या संस्थेकडून कठोर परीक्षण करून मान्यताप्राप्त झाले. एमएमआरडीए चे महानगर आयुक्त श्री आर ए राजीव यांनी माथेरान गिरिस्थानला दिलेली भेट यासाठीच होती की येथील पायवाटांच्या सुधारणेसाठी वापरण्यात आलेले क्ले ब्लॉक्सचे मटेरियल योग्य आहे का याची चाचणी व्हावी त्या विषयी एक विश्वास निर्माण व्हावा. तसेच पुढील सुधारणा कामामध्ये असे ब्लॉक्स वापरण्यासंबंधीचा अंतीम निर्णय घेता यावा. सुशोभीकरणाच्या दृष्टीने उभारण्याच्या स्ट्रीट लायटिंग,सूचना व दिशादर्शक बोर्ड, विश्रांतीसाठी बाके आणि अन्य सुरक्षा रक्षक उपाय योजनांना अंतीम मान्यता मिळावी.

या सर्व गोष्टी माथेरान मॉनिटरिंग कमिटी (एमएमसी) यांनी निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि माथेरान हेरिटेज कमिटी यांनी मान्यता दिलेल्या कार्यपुस्तिकेला अनुसरून राहतील. प्रस्तावित सुधारणा आणि सुविधा यांमुळे पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षणीय प्रमाणात कमी होईल तसेच पर्यावरणाची हानी होण्याचे प्रमाणही कमी होईल असे अपेक्षित आहे. पॅनोरामा पॉइंट, हार्ट पॉइंट, मिऱ्या पॉइंट आणि एको पॉइंट या चार प्रेक्षणीय पॉईंटस् चे सुधारणा व सुशोभीकरणाचे काम आता ७० % पूर्ण झाले आहे. दस्तुरी ते माथेरान पायवाटेचे सुधारणा आणि सुशोभीकरणाचे काम ३५ % पूर्ण झाले आहे. दस्तुरी येथे वाहनतळाचे काम ९० % पूर्ण झाले आहे.