मटका किंग जिग्नेश ठक्कर : बालपणीच्या मित्राने आर्थिक वादातून केली हत्या

matka king shot dead in kalyan
मटका किंगची गोळ्या घालून हत्या

बांधकाम साहित्य पुरवठादार जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याच्यावर शुक्रवारी रात्री त्याच्या कार्यालयाबाहेरच गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिम येथे घडली आहे. या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या जिग्नेश उर्फ मुनिया याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असून या प्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलीस ठाण्यात जिग्नेश याचा बालपणाचा मित्र धर्मेश ठक्करसह दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल कऱण्यात आलेला असून हि हत्या आर्थिक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारानंतर पळून गेलेल्या धर्मेश आणि त्याचा अंगरक्षक जयपाल उर्फ जापान या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मृत जिग्नेश आणि धर्मेश या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

कल्याण पश्चिमेतील दाणाबंदर या ठिकाणी राहणारा जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया (वय ४३) याचा इमारत बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय असून कल्याण शहरात त्याचे दोन कापडाचे दुकाने देखील आहे. जिग्नेश राहत असलेल्या इमारतीच्या समोरच जिग्नेशचा बालपणाचा मित्र धर्मेश उर्फ नुन्नू शहा हा राहण्यास आहे. धर्मेश आणि जिग्नेश बांधकाम साहित्य पुरवठा व्यवसायात काही प्रमाणात भागीदार होते. धर्मेश याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे १५ ते २० गंभीर गुन्ह्याची विविध पोलीस ठाण्यात नोंद असून जिग्नेश याच्याविरुद्ध खंडणी, जबरी चोरीचे ५ गुन्हे दाखल आहेत. २९ जुलै रोजी धर्मेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जिग्नेश तसेच धर्मेशचे मित्र एकत्र आले होते. या दरम्यान जिग्नेशचा धर्मेशच्या मित्र चेतन पटेल यांच्यात वाद झाला होता, व चेतनने बाजारपेठ पोलीस ठाण्यात जिग्नेश आणि त्याच्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावरून धर्मेश आणि जिग्नेश या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.

शुक्रवारी रात्री सडे नऊ वाजण्याच्या सुमारास जिग्नेश हा कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊस जवळ असलेले आपले कार्यलय बंद करून तेथील काही व्यापाऱ्यांसह गप्पा मारत असताना पावणे दहाच्या सुमारास धर्मेश आणि त्याचा अंगरक्षक तथा वाहन चालक जयपाल उर्फ जापान हे दोघे जिग्नेशजवळ आले व धर्मेश आणि जयपाल या दोघांनी स्वतःजवळील रिव्हॉल्वर मधून जिग्नेशवर पाच राउंड फायर केले. या गोळीबारात जिग्नेश जमिनीवर कोसळताच त्याच्यासोबत गप्पा मारणाऱ्या व्यापाऱ्यांनी धर्मेशला पकडण्याचा प्रयत्न केला असता धर्मेशने त्याच्यावर रिव्हॉल्वर रोखत त्यांना धमकी देत तेथून पळ काढला. गोळीबारात जखमी झालेल्या जिग्नेशला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले ज्योतिबा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पोलिसांना घटनास्थळावर रिकाम्या पाच पुंगळ्या मिळून आलेल्या असून या प्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलीस ठाण्यात धर्मेश आणि त्याचा अंगरक्षक जयपाल उर्फ जापान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. ही हत्या आर्थिक वाद तसेच तत्कालीन झलेल्या वादातून झाली असल्याची शक्यता पानसरे यांनी वर्तवली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनकर यांनी दिली.

हेही वाचा –

यंदा मुंबईत २०० हून अधिक कृत्रिम तलाव, प्रत्येक वॉर्डात एका तलावचे नियोजन!