घरमुंबई'या' उद्यानासाठी आता मोजावे लागणार प्रवेश शुल्क

‘या’ उद्यानासाठी आता मोजावे लागणार प्रवेश शुल्क

Subscribe

जोगेश्वरीतील मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यानासाठी आता सर्वसामान्यांना प्रवेश शुल्क मोजावे लागणार आहे. उद्यानात प्रवेशासाठी लहान मुलांना ५ रुपये, तर १२ वर्षावरी सर्वांना २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

जोगेश्वरी पूर्व परिसरातील पूनम नगरमध्ये असलेल्या ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ उद्यानाला भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांना आता प्रवेशशुल्क मोजावा लागणार आहे. १२ वर्षांखाली मुलांसाठी प्रत्येकी ५ रुपये तर त्यावरील पर्यटकांसाठी प्रत्येकी २५ रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. राणीबागेतील पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी शुल्क आकारल्यानंतर महापालिकेने थीम गार्डनकरता प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिल्पग्राम उद्यानाचे प्रवेश शुल्क आकारण्याचे निश्चित केले आहे. दररोज सुमारे ३ हजार नागरिक या शिल्पग्रामास भेट देतात. तर सुटीच्या दिवशी ही संख्या काही पटींनी वाढून १० हजारांचा टप्पाही ओलांडते.

मुंबई महापालिकेने विकसित केलेल्या या शिल्पग्रामात शिल्पांच्या माध्यमातून १२ बलुतेदारांच्या कला-कौशल्याची ओळख, विविध भारतीय नृत्यशैलींवरील आकर्षक व माहितीपूर्ण शिल्प, संगीतमय कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. या शिल्पग्रामाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून येथे येणाऱ्या अभ्यागतांची संख्या देखील गर्दीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. या गर्दीत मुलांची व पालकांची चुकामूक होण्याची शक्यता तसेच असामाजिक तत्व या गर्दीचा फायदा घेण्याची संभाव्यता आणि शिल्पांचे सौंदर्य नष्ट होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शिल्पग्राम प्रवेश सशुल्क करण्याचा निर्णय घेतला. या शुल्कातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग शिल्पग्रामात येणा-या अभ्यागतांना अधिक चांगल्या सोयीसुविधा देणे, शिल्पग्रामाचे परिरक्षण करणे इत्यादी बाबींसाठी करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले.

- Advertisement -

विद्यार्थिनींसाठी निशुल्क प्रवेश

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ हे बुधवार वगळता दररोज सकाळी ६ आणि १० व सायंकाळी ४ ते ८ खुले असते. या शिल्पग्रामामधील प्रवेश सशुल्क करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला आहे. सदर प्रस्तावानुसार ३ वर्षांपर्यंत वय असणाऱ्या बालकांसाठी निशुल्क प्रवेश असेल. तर ३ ते १२ वयोगटामधील व्यक्तीसाठी ५ रुपये प्रस्तावित करण्यात आले असून १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी २५ रुपये एवढे शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. याचबरोबर सहलीसाठी येणाऱ्या महापालिका शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी निशुल्क प्रवेश देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून खासगी शाळांच्या सहलीबाबत पूर्व परवानगी घेतलेली असल्यास संबंधित शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये एवढे शुल्क देय असेल. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील २ प्रौढ व २ मुले (वयोगट ३ ते १२ वर्षे) एकसाथ आल्यास त्यांना २५ रुपयांच्या एकत्रित शुल्कात प्रवेश देण्यात येईल.

काय पाहायला मिळेल तिथे?

जोगेश्वरी पूर्वेतील वेरावली जलाशयाजवळ असणा-या ३ लाख ७० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ (८.५ एकर)असणा-या महापालिकेच्या भूखंडावर आकारास आलेल्या शिल्पग्रामाचे गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर २०१८ रोजी लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी विविध कलाकौशल्यांची ओळख करुन देणारी शिल्प, संगीत कारंजे यासह वृक्ष, शोभेची झाडे,वेलीही आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी झोके, घसरगुंडी,मेरि-गो-राऊंउ यासारखी विविध खेळणी देखील याठिकाणी आहेत.

- Advertisement -

कला, शिल्पाचे दर्शन

संपूर्ण देशातील विविध कला या शिल्पांच्या माध्यमातून दाखविता याव्यात आणि नवीन पिढीला विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील कला आणि संस्कृतीची ओळख व्हावी, या प्रमुख उद्देशाने महापालिकेद्वारे शिल्पग्रामाची(Artisans Village) निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या गेलेल्या १२ बलुतेदारांच्या कला-कौशल्यांवर आधारित माहितीपूर्ण शिल्प देखील या शिल्पग्रामामध्ये आहेत. त्याचबरोबर विविध भारतीय नृत्य शैलींची ओळख करुन देणाऱ्या शिल्पांचाही समावेश याठिकाणी आहे. यामध्ये प्रामुख्याने कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, भांगडा, गरबा यासह लावणीचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -