घरCORONA UPDATEमाटुंगा लेबर कॅम्प बनला धारावीतील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट

माटुंगा लेबर कॅम्प बनला धारावीतील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट

Subscribe

गुरुवारपर्यंत धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४२५ वर पोहोचली होती. परंतु यापैकी १२७ रुग्ण हे केवळ माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील आहेत.

अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मुंबईतील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत दिवसेंदिवस बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गुरुवारपर्यंत धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४२५ वर पोहोचली होती. परंतु यापैकी १२७ रुग्ण हे केवळ माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्ण संख्येच्या ९ ते १० टक्के एवढी संख्या केवळ माटुंगा लेबर कॅम्प या वस्तीतच आढळून आली असून या वस्तींमध्ये बहुतांशी महापालिकेचे सफाई कामगार, महापालिकेचे रुग्णालयीन कामगार, खासगी रुग्णालयांमधील कामगार व कर्मचारी राहत आहे. त्यामुळे अत्यावश्यके सेवेच्या कामगार, कर्मचाऱ्यांची वस्ती असलेला लेबर कॅम्प हा आता धारावीतील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट बनलेला पाहायला मिळत आहे.

धारावीतील सीमारेषेवर वसलेल्या माटुंगा लेबर कॅम्प याठिकाणी २९ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून  आला होता. धारावीत खऱ्या अर्थात पहिला रुग्ण डॉ. बलिगा नगर येथे १ एप्रिल रोजी आढळून आला. पण पुढील २९ दिवस माटुंगा लेबर कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. लेबर कॅम्प शेजारी असलेल्या वैभव इमारतीतील सुरुवातीला रुग्ण आढळून आल्यानंतरही लेबर कॅम्प सुरक्षित होते. परंतु  २९ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर पहिले चार दिवस एक-एक रुग्ण आढळून येत असतानाच ३ व ४ मे रोजी अनुक्रमे ११ व ७ बाधित रुग्ण आले. त्यानंतर सरासरी चार ते पाच रुग्ण आढळून येते. परंतु १५ मे रोजी एकाचवेळी  १७ रुग्ण तर त्यानंतर सात व सहा रुग्ण आढळून येत १८ मे रेाजी पुन्हा १८ रुग्ण आढळून आले. त्यानुसार पुन्हा सहा-सहा रुग्ण आढळून आले.

- Advertisement -

लेबर कॅम्प ही पूर्णपणे श्रमिक वस्ती आहेत. या वस्तीमध्ये महापालिकेचे कामगारच मोठ्या संख्येने राहत आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसह महापालिकेची विविध रुग्णालये, हिंदुजा व अन्य खासगी रुग्णालयांमधील कामगारवर्ग याठिकाणी राहत आहे. हा सर्व कामगार अत्यावश्यक सेवेतील असल्याने कामानिमित्त बाहेर पडणे आणि सेवा बजावताना त्याची योग्यप्रकारे काळजी न घेतल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने याठिकाणी पसरताना दिसत आहे. संपूर्ण धारावी मुकुंद नगर, सोशल नगर,  धारावी क्रॉस रोड, ६० फुटी रस्ता, ९० फुटी रस्ता, कुंचिकुरवे नगर आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात करोना बाधित रुग्ण असले तरी धारावीत सर्वाधिक जास्त माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मागील २३ दिवसांमध्ये आढळून आले आहे.

याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेविका हर्षला आशिष मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वस्तीत मोठ्याप्रमाणात महापालिकेचे कामगार राहत आहेत. काही महापालिकेच्या सफाई विभागात काम करता तर काही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये. तर काही खासगी रुग्णालयांमध्ये काम करणारे आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी हे कामगार घराबाहेर पडता आणि रुग्णालयात किंवा बाहेर त्यांना याची लागण झालेली आहे. त्यातच हे सर्व रहिवाशी सामुहिक शौचालयांचा वापर करत आहेत. त्यामुळे शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. त्यामुळे  वस्तीत स्क्रीनिंग करून अधिक रुग्ण शोधून काढले. ज्यामुळे या वस्तीत अधिक रुग्ण वाढलेले दिसतात, असे त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -