घरमुंबईमावळच्या रणांगणात पार्थसाठी पवारांची मोर्चेबांधणी

मावळच्या रणांगणात पार्थसाठी पवारांची मोर्चेबांधणी

Subscribe

पार्थ वि.बारणे लढत रंगणार

शरद पवारांची तिसरी पिढी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरली असल्याने या मतदार संघाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या मतदार संघात बलाढ्य उमेदवार विरोधात नवखा उमेदवार अशी लढत असल्याने राज्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे.याच दरम्यान पार्थ पवार यांचे इंग्रजीमधून भाषण व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने पार्थ पवारच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे मदतीला संपूर्ण पवार कुटुंबीय मदतीला उतरले आहे. मोदी लाटेत अनेकांचा पराभव झाल्यावर आता असताना अनेक राजकीय पक्ष डबघाईला आले होते. त्यात पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना मैदानात उतरवून त्याला निवडून आणणे पवारांसमोर एक मोठे आव्हान आहे. पार्थ पवारला जेवढे तिकीट देणे सोपे होते तेवढे त्यांना विजय मिळवून देणे अजित पवारांना सोपे नाही. कारण पार्थला पर्यायाने अजित पवारांना हरवण्यासाठी भाजप व सेना नेटाने लढतील हे नक्की! मावळ मतदारसंघाची सध्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पार्थच्या विजयासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीने पहिला अध्याय पूर्ण झाला असला तरी निवडून येण्याचा दुसरा अध्याय अद्याप बाकी आहे.

पार्थ यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी नकार दिला होता. मात्र नंतर त्यांची उमेदवारी जाहीर करताना कार्यकर्ते, सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांचा पार्थसाठी आग्रह होता. हे अधोरेखित केले आहे. म्हणजे राष्ट्रवादीची सारी भिस्त या दोघांवर आहे, हे उघड आहे. मावळमधील राजकीय समीकरणे सोपी नाहीत. कोकण आणि घाटाला जोडणारा मावळ मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि कर्जत हे मुंबईच्या जवळचे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये आहेत. पनवेल आणि उरण हे विधानसभा मतदारसंघ कधीकाळी शेकापचे बालेकिल्ले नक्की होते.२००९ पर्यंत पनवेलमधून सलग बारावेळा शेकापचा उमेदवार विजयी झाला होता. २००९ मध्ये ही परंपरा खंडित झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पनवेल आणि उरण अशा दोन्ही ठिकाणी शेकापचा पराभव झाला. विवेक पाटील यांच्यासारखा शेकापचा कर्तबगार नेता उरणमध्ये पराभूत झाला. तेथे सेनेचे मनोहर भोईर विजयी झाले. पनवेलची जागा भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी जिंकली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येदेखील शेकापला मोठा फटका बसला.

- Advertisement -

पनवेलची महापालिका एकहाती भाजपने जिंकली आणि शहरावरील पकड कायम राखली. पण याचा अर्थ शेकाप संपला असा नाही. शेकापची काही मते नक्की आहेत पण पक्षाचा उमेदवार नसताना शेकापचे मतदार कितपत उत्साह दाखवतील, ते पाहावे लागेल. राहिला कर्जत मतदारसंघ. तो राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांच्याकडे आहे. पण येथे त्यांचीही पकड ढिली होताना दिसत आहे. कारण नुकत्याच झालेल्या कर्जत नगरपालिका निवडणुकीत त्यांना पालिका जिंकता आलेली नाही. ती सेनेच्या ताब्यात गेली आहे. म्हणजे पक्षात सारे आलबेल नाही. सुरेश लाड यांनीही हे अनुभवले आहे. घाटावरही राष्ट्रवादीच्या हातून पिंपरी चिंचवड महापालिका गेलेली आहे. तेथे आज भाजपची सत्ता आहे. भाजप-सेनेचे मिळून जवळपास दहा नगरसेवक आहेत. शिवाय मावळ लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील तीनपैकी एकही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही. पिंपरीत सेनेचे गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आमदार आहेत आणि मावळची जागादेखील भाजपकडे आहे. म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघ भाजप-सेनेच्या ताब्यात आहेत. दोन महापालिका भाजपकडे आहेत आणि शिवसेनेने सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघावर विजय संपादन केलेला आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांना तिसर्‍या क्रमांकाची केवळ 1,82,293 मते मिळाली होती. तर अपक्ष लक्ष्मण जगताप यांना 3,54,820 मते मिळाली होती. या निवडणुकीत श्रीरंग बारणे 1,57,394 मताधिक्क्याने विजयी झाले होते.

पवार घराण्याचा वारसा याशिवाय पार्थ यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. सेनेने उमेवारांच्या पहिल्या यादीत या मतदारसंघाचा समावेश केला असून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटीचा विस्तार, विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, नवी मुंबई-उरण रेल्वेमार्गाचे श्रेय घेत भाजप राष्ट्रवादीवर मात करण्याचा प्रयत्न करू शकते. युतीसाठी एक एक जागा महत्त्वाची असल्याने दोन्ही पक्ष ही लढाई जिंकण्यासाठी आणि अजित पवारांना हरवण्यासाठी नेटाने लढतील. यामुळेच ‘तू आहे त्या पक्षातच रहा; पण पार्थला मदत कर,’ अशा आशयाचे फोन शहरातील अनेकांना येऊ लागले आहेत. यामुळे जसे जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत तसतशी मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला.यावेळी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वितुष्ट आणि शरद पवारांशी असलेले संबंध यामुळे जगताप यांच्या भूमिकेवर मावळातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.मतदानाला अवघे सात ते आठ दिवस राहिल्याने युती व आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत.नुकतेच खारघर मध्ये पवार व बारणे यांनी जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ केला असून पनवेल परिसरात प्रचाराला भर दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -