घरमुंबईसोन्याची बनावट बिस्कीटे देऊन व्यापार्‍याची फसवणूक

सोन्याची बनावट बिस्कीटे देऊन व्यापार्‍याची फसवणूक

Subscribe

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखेची दहिसर येथे कारवाई

सोन्याची बनावट बिस्कीटे देऊन एका व्यापार्‍याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दीपक भीमराव शिंदे असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून तो चेंबूरच्या आनंदनगर, घाटला गावचा रहिवाशी आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच फसवणुकीच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

अटकेनंतर त्याला स्थानिक कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दीपकचे तीन सहकारी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने आतापर्यंत अनेक व्यापार्‍यांची फसवणूक केल्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. यातील तक्रारदार सोन्याचे व्यापारी असून ते झव्हेरी बाजार येथील व्यापार्‍याकडून सोने खरेदी करतात. काही दिवसांपूर्वी त्यांची दोन तरुणांशी ओळख झाली होती. यावेळी या दोघांनी त्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने देतो असे सांगितले. तीस हजार प्रति दहा ग्रॅम या दराने दोन हजार ग्रॅम वजनाचे सोने देऊ, असे ते म्हणाले. त्यासाठी त्यांना मिरारोड येथे बोलाविण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांना 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक बिस्कीट दिले होते. ते बिस्कीट पडताळून पाहिल्यानंतर त्यांची खात्री झाली होती. त्यानंतर ते सोन्याचे बिस्कीट घेऊन जाण्यासाठी सतत त्यांना फोन करीत होते, मात्र पैशांची व्यवस्था झाली नसल्याचे सांगून त्यांनी काही दिवस थांबण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघेही त्यांना तीसऐवजी वीस हजार रुपयांमध्ये प्रति दहा ग्रॅम सोने देण्यास तयार झाले होते. मात्र ते दोघेही इतक्या कमी किंमतीत सोने का विकत आहेत, याचा त्यांना संशय आला.

- Advertisement -

ते सोने चोरी किंवा फसवणुकीच्या गुन्ह्यातील असावे म्हणून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक हरिश पोळ यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी त्याची शहानिशा करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर सागर शिवलकर, अतुल आव्हाड, हरिश पोळ, संतोष गायकवाड आणि पोलीस पथकाने दहिसर येथील गावदेवी मंदिर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली. तिथे आलेल्या दीपक शिंदे या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी शंभर ग्रॅम वजनाची वीस सोन्याची बिस्कीटे पोलिसांनी हस्तगत केली. ते सर्व सोने खोटे होते. या सोन्याच्या बिस्कीटला बाहेरुन सोनेरी मुलामा दिल्याचे उघडकीस आले. या व्यापार्‍याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कट रचून हा व्यवहार ठरविण्यात आला होता.

दीपक व त्याच्या तीन सहकार्‍यांनी अशाच प्रकारे काही व्यापार्‍यांची फसवणूक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक करणारी ही एक सराईत टोळी आहे. ही टोळी काही व्यापार्‍यांची रेकी करुन त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत होते. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दीपकविरुद्ध दहा गुन्ह्यांची नोंद असून त्याला यापूर्वीही अशाच गुन्ह्यात अटक झाली होती. सध्या तो जामिनावर होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा फसवणूक करण्यास सुरुवात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -