मेट्रो लाईन ९ वर पांडुरंगवाडी स्टेशन जोडणार दोन शहर

मिरा भाईंदर आणि मुंबई पश्चिम उपनगर जोडणार

metro 9

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो मार्गांच्या प्रकल्पाअंतर्गत ३३७.१ किलोमीटरचे जाळे हे मुंबई महानगर प्रदेशात विकसित करण्यात येत आहे. येत्या २०२६ अखेरीस हे मेट्रो प्रकल्पांचे जाळे संपुर्ण मुंबई महानगर क्षेत्र पिंजून काढेल. मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे भक्कम करण्यासाठीच विविध वाहतूक यंत्रणांची एकमेकांशी इंटरकनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे. प्रत्येक मेट्रो लाईन एकमेकांशी कनेक्ट असेल असा या प्रकल्पांचा उद्देश आहे. महत्वाचे म्हणजे उपनगरीय लोकल आणि रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठीच या मेट्रो मार्गांचा विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून मेट्रो मार्ग ९ च्या माध्यमातून पांडुरंगवाडी स्टेशन हे महत्वाचे ठरणार आहे. दहिसर ऑक्ट्रॉय नाका येथील इंटरजेंच स्टेशन म्हणून मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाईन १० साठी हे स्टेशन महत्वाचे असणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगर आणि मिरा भाईंदर या दोन शहरांना इंटरकनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन ९ अंतर्गत एमएमआरडीएने अलायमेंट बदलले आहे. मुंबई महापालिकेची जुना ऑक्ट्रॉय नाक्याच्या प्रवेशद्वारालाच या प्रकल्पाअंतर्गत जागा वापरण्यात येणार होती. पण महापालिकेने पर्यायी जागा दिल्यानेच आता या प्रकल्पादरम्यान अलायमेंटचा बदल होणार आहे. त्यामुळेच स्टेशनची जागाही बदणार आहे. आधीच्या अलायमेंटनुसार १५० बांधकामे तोडण्यात येणार होती. त्यामध्ये हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आणि कमर्शिअल जागाही तोडण्यात येणार होत्या. आधीचे स्टेशन पश्चिम दिशेला बांधण्यात येणार होते, पण आता नव्या अलायमेंटनुसार पूर्व दिशेला बांधण्यात येणार आहे.

मेट्रो लाईन ९ साठी सुरूवातीला अलायमेंट ही दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत तयार करण्यात आली होती. याआधीच्या प्लॅननुसार ओवरीपाडापासून पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गानजीक टोलप्लाझापर्यंत हा मार्ग होता. पण अनेक अडथळ्यांमुळे हा मार्ग पश्चिमेला बदलण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या कोणत्या गोष्टी शक्य आहेत ही गोष्ट लक्षात घेऊनच ही जागा निश्चित करण्यात आली.

मेट्रो ९ साठीचा मार्ग हा दहिसर – मिरा भायंदर दरम्यानचा एकुण ११ किमीचा आहे. या मार्गात एकुण ८ स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो ७ अंतर्गत अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा मार्ग आहे. एकुण १६.५ किमी मार्गावर दोन टप्प्यात हे काम होणार आहे. सध्या मेट्रो ७ साठीचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. तर मेट्रो २ अ आणि मेट्रो ९ साठीचे काम सुरू आहे.